लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: क्रिकेटच्या मैदानावर सचिन...,सचिन...असा जयघोष काही वर्षांपूर्वी हमखास ऐकायला मिळायचा. सचिनच्या चाहत्यांनी हा जयघोष ‘लोकप्रिय’ केला होता. भारतीय बॅडमिंटनच्या स्टार खेळाडूंनी हा माहोल गेल्या काही वर्षांत स्वत:कडे खेचला. त्याचा प्रत्यय ८२ व्या राष्टÑीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सोमवारी विभागीय क्रीडा संकुलात आला. जवळपास १० वर्षांनंतर राष्टÑीय स्पर्धा खेळणारे सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांतसारखे मातब्बर बॅडमिंटनपटू नागपुरात स्वत:च्या नावाचा जयघोष होताना पाहून चांगलेच सुखावले.आंतरराष्टÑीय आणि विश्व स्पर्धेतही असे चित्र अभावानेच पाहायला मिळते. मानकापूरच्या क्रीडा संकुलात प्रथमच आयोजित या स्पर्धेच्या निमित्ताने दिग्गजांचा खेळ पाहण्यासाठी १० ते १२ शाळांचे हजारो विद्यार्थी दाखल होताच संकुल गर्दीने फुलले होते. आई-वडिलांसोबत आलेले विद्यार्थीही उत्साहात होते.उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी सिंधूचे आगमन होताच गर्दीने सिंधू...,सिंधू..., असा एकच जल्लोष केला. थोड्याच वेळात ‘फुलराणी’ सायनाचे आगमन झाले. प्रेक्षकांनी सायना..., सायना...असा गजर करीत संकुल दणाणून सोडले. काही विद्यार्थ्यांनी सिंधू आणि सायना यांना शुभेच्छा देणारे फलक सोबत आणले होते. सायना, सिंधू यांनी प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारताना हात उंचावून प्रतिसाद दिला.सामन्यादरम्यानदेखील दोघींच्या सर्व्हिसवर प्रचंड टाळ्या पडल्या. सायना जिंकली तेव्हा चाहत्यांनी उभे राहून अभिनंदन केले, शिवाय पुन्हा एकदा सायनाच्या नावाचा घोष करीत फुलराणीचा विजय संस्मरणीय ठरविला.सिंधूने रेवती देवस्थळेवर एकतर्फी विजय नोंदविल्यानंतर गर्दीतून टाळ्यांचा पाऊस पडला. लहान मुलांनी सिंधूचा ‘लूक’ कॅमेºयामध्ये साठवून घेण्यासाठी मोबाईलचा ‘फ्लॅश’ तिच्या दिशेने रोखला. या दोघींशिवाय श्रीकांत, बी. साईप्रणीत हे भारतीय संघातील परिचित चेहरे प्रेक्षकांचे आकर्षण आहेत. संकुलात त्यांचेही ‘कटआऊटस्’ लागले आहेत. हे खेळाडू कोर्टवर आले की, शाळकरी मुले टाळ्यांचा गजर करीत उत्साह द्विगुणित करतात.काही विद्यार्थी आई-वडिलांकडे आग्रह करीत सामने पाहायला आले होते. उद्या शाळेचा पेपर आहे. आम्हाला सायना, सिंंधूचा सामना पाहू द्या. उशिरापर्यंत आम्ही अभ्यास करू, असा भरवसा देत विद्यार्थ्यांनी सामन्यांंचा आनंद लुटला.देशाची पताका उंचावणाºया या दिग्गजांचा खेळ ‘याचि देही याचि डोळा’ अगदी जवळून पाहिल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहºयांवर ओसंडून वाहत होता.दुसरीकडे आपल्या आवडत्या खेळाडूंची स्वाक्षरी मिळविता आली नाही, त्यांच्यासोबत छायाचित्र काढता आले नाही,याची हुरहुर देहबोलीतून जाणवली.
सिंधू...सिंधू...सायना...सायना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 12:28 AM
क्रिकेटच्या मैदानावर सचिन...,सचिन...असा जयघोष काही वर्षांपूर्वी हमखास ऐकायला मिळायचा.
ठळक मुद्देक्रीडा संकुल दुमदुमले : चाहत्यांच्या घोषणांना फुलराणी, पीव्हीचा उत्स्फूर्त प्रतिसाद