कोंढाळी : नागपूर-अमरावती महामार्गावरील सातनवरी नजीकच्या इंडस पेपर मिलला लागलेली भीषण आग अखेर मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नियंत्रणात आली. इंडस पेपर मिलला यापूर्वी ३ एप्रिल २०१८ रोजी भीषण आग लागली होती. यापूर्वी आग लागूनही आवश्यक उपायोजना न करण्यात आल्याने या पेपर मिलला पुन्हा आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
कोंढाळी, बाजारगाव, सातनवरी भागात अनेक पेपर मिल्स आहेत. पेपर मिलला उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटना होतात. पेपर तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून वेस्ट कागदाचा उपयोग करण्यात येतो. वेस्ट कागदाला मोठमोठ्या टाकीत सडवून त्याचा पल्प तयार करून त्यापासून पुन्हा कागद तयार करण्यात येतो. भारतातील वेस्ट कागदापेक्षा विदेशातील आयातीत वेस्ट पेपर स्वस्त पडतो. म्हणून पेपर मिल विदेशातून वेस्ट पेपरची आयात करतात. विदेशातून आयातीत वेस्ट पेपरमध्ये काही रसायन लागले असल्यास उन्हात विशिष्ट तापमानात हे कागद पेट घेतात. त्यामुळे पेपर मिलला आग लागण्याच्या घटना घडतात.
कोंढाळी व बाजारगाव येथील पेपर मिल पॅकिंगकरिता उपयोगात येणारा ब्राऊन क्राफ्ट पेपर तयार करतात. सातनवरी शिवारातील इंडस पेपर मिलमध्ये मात्र टिश्यू पेपर व कागदाचे पेपर नॅपकिंन, किचन टॉवेलचे जवळपास दररोज ४० ते ५० टन उत्पादन केले जाते.
इंडस पेपर मिलला दोन वर्षापूर्वी लागलेल्या आगीत जवळपास चार ते पाच कोटींचे नुकसान झाले होते. यानंतरही कंपनी परिसरात आग विझविण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या नाही. तसेच पेपर मिलच्या बाजूला रोड आहे. या रोडवर परिसरातील लोकांची ये-जा असते. मात्र या भागात संरक्षण भिंत नाही. फक्त तारांचे कुंपण आहे. वेस्ट कागदाचा माल उघड्यावर पडला असतो. एखाद्याने बिडी-सिगारेट पिऊन फेकली तरी आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोमवारी ४.१५ वाजता कंपनी परिसरात लागली. आग इतकी भीषण होती की ५ कि.मी. अंतरापासून आगीचे लोळ दिसत होते. आग लागताच कंपनीचे कर्मचारी व स्थानिक लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण एकदा कागदाला लागलेली आग विझविणे कठीण असते. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास नागपूर महानगरपालिका अग्निशमन दलाची पहिली गाडी आली नंतर कळमेश्वर, हिंगणा, सोलार, वाडी येथील अग्निशमन दलाच्या सात गाड्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास आग नियंत्रणात आली. मात्र आग अद्यापही विझली नाही. कारण कागदाचे गठ्ठे आतून पेटतच असतात. जेसीबीने गठ्ठे बाहेर खेचून पाण्याचा सतत मारा केला जात आहे.