नागपूर : नागपुरातील पगारिया समूहाने देशातील जैन समाजातील यशस्वी उद्योगपती आणि व्यावसायिकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जीतो) नागपूर चॅप्टर अंतर्गत ‘पगारिया जेबीएन’ (जैन बिझनेस नेटवर्क) सादर तीन दिवसीय महाकुंभचे आयोजन २८ जूनपासून प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण स्कूल (आरपीटीएसफढळर) मैदान, लक्ष्मीनगर येथे होणार आहे.
जैन समाजातील व्यापारी समुदायाला त्यांच्या व्यवसाय पद्धतींमध्ये काळानुरूप बदल, आत्मविकास, सामाजिक विकास, देशाचा विकास तसेच आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने आवश्यक बदलांबाबत प्रबोधन आणि उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. जीतो अॅपेक्स (मुख्य संघटना) अंतर्गत देशविदेशातील जीतोचे ७० चॅप्टर कार्यरत आहेत.
‘पगारिया जेबीएन महाकुंभ’चे उद्घाटन शुक्रवार, २८ जून रोजी सकाळी ११.४५ वाजता होणार आहे. यावेळी मध्य प्रदेशचे संसदीय कामकाज मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय, हल्दीरामचे संस्थापक शिवकिशन अग्रवाल, बँकर आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस, सोलर इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक मनीष नुवाल, जीतो अॅपेक्सचे चेअरमन सुखराज नहार, अध्यक्ष कांतीलाल ओसवाल, सरचिटणीस मनोज मेहता, जेबीएन अॅपेक्सचे अध्यक्ष राजेश चंदन आणि इतर मान्यवर व प्रमुख वक्ते उपस्थित राहतील.
आयोजनाची माहिती देताना जीतो नागपूर चॅप्टरचे चेअरमन आणि मुख्य प्रायोजक सीए उज्ज्वल पगारिया आणि पगारिया जेबीएन महाकुंभचे संयोजक कैलास गोलेछा यांनी सांगितले, महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशी २९ जून रोजी सकाळी ११.४५ वाजता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, खासदार प्रफुल्ल डॉ. पटेल आणि माजी खासदार अजय संचेती हे 'व्हिजन भारत : इंडियाज सुपर पॉवर स्टेटस' या विषयावर मार्गदर्शन करतील. दुपारी १२.३० वाजता लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी राज्यसभा खासदार डॉ. विजय दर्डा हे ‘इफेक्टिव्ह मीडिया स्ट्रॅटेजीज फॉर बिझनेस’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
अखेरच्या दिवशी ३० जून रोजी दुपारपर्यंत मार्गदर्शन सत्रे होतील. या संपूर्ण महाकुंभात सुमारे दोन हजार जैन व्यापारी, उद्योजक एकत्र येणार असल्याची माहिती सीए उज्ज्वल पगारिया आणि कैलास गोलेछा यांनी दिली.
मलायका अरोरा, अमित त्रिवेदी करतील मनोरंजनपहिल्या दिवशी २८ जून रोजी सायंकाळचे सत्र मनोरंजनाने भरलेले असेल. पगारिया लेक इस्टेट, कापसी येथे सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. यादरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा फॅशन सेलिब्रेटींसोबत ‘फॅशन उद्योजकताचे भविष्य’ या विषयावर सादरीकरण करणार आहे. त्याचबरोबर सुप्रसिद्ध गायक अमित त्रिवेदी यांचा ‘म्युझिकल महाएंटरटेन्मेंटस’ कार्यक्रम होईल. यादरम्यान ते मधुर गाणी सादर करतील. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महाराष्ट्र आणि भारत : वे अहेड’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी २ हजार उद्योजक व वक्ते उपस्थित राहतील.
कपिल देव यांच्यासह ७५ सेलिब्रिटी मार्गदर्शन करणारशार्क टँक फेम आणि बोट लाइफस्टाइलचे सह-संस्थापक अमन गुप्ता, महान क्रिकेटर कपिल देव, सीएनबीसी टीव्ही-१८ असोसिएट एडिटर मंगलम मालू, कोटक महिंद्रा एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शाह, कॉन्फिडन्स पेट्रोलियमचे व्यवस्थापकीय संचालक नितीन खारा, संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन व संस्थापक संजय घोडावत, गायिका शिबानी कश्यप, महिंद्रा हॉलिडेजचे अध्यक्ष सी.पी. गुरनानी, नॅसकॉमचे उपाध्यक्ष संदीप बहल, युनिकॉर्न अखिल गुप्ता, विशेष खुराना, सौरभ जैन, नितीन जैन आणि उद्योग, व्यवसाय, आयकर, आरोग्य, मनोरंजन क्षेत्रातील ७५ व्यक्ती आपापल्या सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
आरपीटीएएसमध्ये उभारला भव्य एसी डोममहाकुंभासाठी आरपीटीएस मैदानात १ लाख चौरस फूट जागेत वातानुकूलित डोम उभारण्यात आला आहे. मुख्य कार्यक्रम आणि वक्त्यांचे मार्गदर्शन सत्र होईल. तसेच भोजनासाठी स्वतंत्र डोम करण्यात आला आहे. एवढेच नाही तर प्रायोजकांच्या स्टॉल्ससोबत जैन घर्मातील सेवा आणि दान या तत्त्वांवर आधारित चित्रेही लावण्यात आली आहेत.