राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : राज्य शासनाने एका अध्यादेशाद्वारे पशुधन पर्यवेक्षकांचे गुरांवर उपचार करण्याचे अधिकार काढून घेतले आहेत. पावसाळ्यात गुरांना साथीच्या आजाराची माेठ्या प्रमाणात लागण हाेत असल्याने त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी फक्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर साेपविली आहे. रिक्त पदामुळे रामटेक तालुक्याची भिस्त आता केवळ दाेन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतींची अवस्थाही दयनीय आहे.
राज्य शासनाच्या आदेशान्वये रामटेक तालुक्यातील बहुतांश पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पशुधन पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली हाेती. ते पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत गुरांच्या लसीकरणासाेबतच त्यांच्यावर उपचार करण्याची कामेही समर्थपणे पार पाडायचे. राज्य शासनाने नुकताच एक अध्यादेश जारी करीत त्यांना गुरांवर उपचार करण्यास प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे त्यांनीही उपचाराची सेवा देणे बंद केले आहे.
गुरांचे पावसाळ्याच्या ताेंडावर लसीकरण करणे अनिवार्य असताना ही माेहीम मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी ठप्प आहे, अशी माहिती महादुला येथील शेतकरी सारंग काठाेके यांनी दिली. खासगी डाॅक्टरांची कमतरता असून, आहेत ते याेग्य उपचार करीत नाही. शिवाय, पैसेही अधिक घेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पशुधन पर्यवेक्षकांचे अधिकार काढून घेण्यात आल्याने तालुकाभरातील गुरांवर उपचार करणार काेण आणि तालुक्यात कार्यरत असलेले दाेन पशुवैद्यकीय अधिकारी एकाच वेळी कुठे कुठे जाऊन गुरांवर उपचार करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
...
बकऱ्यांचा मृत्यूदर वाढला
पावसाळ्यात गुरांसाेबत बकऱ्या व मेंढ्यांना घटसर्प, ताेंडखुरी, पायखुरी, ताप येणे, फऱ्या, ॲथ्रेक्स, ब्रुराेल्लाेसिस यासह अन्य गंभीर आजारांची लागण हाेते. यातील काही आजारांची लागण हाेऊ नये म्हणून गुरांचे वेळीच लसीकरण देखील करावे लागते. पशुवैद्यकीय विभागात आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे लसीकरणाकडेही दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच सालेमेटा व इतर गावांमध्ये बकऱ्या आजारी हाेण्याचे व त्यात त्यांचा मृत्यू हाेण्याचे प्रमाण वाढले आहे.
...
गुरे रामटेक व कांद्रीला न्यावी का?
सध्या रामटेक पंचायत समिती कार्यालय आणि कांद्री येथील श्रेणी-१ च्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. इतर श्रेणी-१ दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. श्रेणी-२ च्या दवाखान्यात या अधिकाऱ्यांची नियुक्तीच नाही. मग, गुरांना गंभीर आजार झाल्यास त्यांना उपचारासाठी रामटेक अथवा कांद्रीला न्यायचे का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शासन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरणार नसेल तर श्रेणी-२ च्या दवाखान्यांचा उपयाेग काय?
...
श्रेणी-२ दवाखाने निकामी?
रामटेक तालुक्यात देवलापार, कांद्री, हिवराबाजार, करवाही (सर्व जिल्हा परिषद) आणि भंडारबाेडी (सर्व राज्य सरकार) येथे श्रेणी-१ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यातील कांद्री येथे पशुवैद्यकीय अधिकारी असून, इतर दवाखान्यातील पदे रिक्त आहेत. महादुला, उमरी, पथरई, टांगला (सर्व जिल्हा परिषद), काचूरवाही, नगरधन, आमडी, पवनी व शिवनी (सर्व राज्य सरकार) येथे श्रेणी-२ चे दवाखाने आहेत. या ठिकाणी सरकार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार की हे दवाखाने माेडित काढणार, हे मात्र शासनाने स्पष्ट केले नाही.