लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : तालुक्यातील निरव्हा ग्रामपंचायतमधील महिला सदस्य अपात्र ठरल्या आहेत. रूपा रामू भामले असे अपात्र सदस्याचे नाव असून, जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणे त्यांना महागात पडले आहे.
२६ सप्टेंबर २०१८ ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत रूपा भामले या सालई येथील वॉर्ड क्रमांक २ मधून विजयी ठरल्या होत्या. नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून त्यांनी निवडणूक लढविली. विहित मुदतीमध्ये जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही.
नामनिर्देशनपत्र सादर करतेवेळी निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची हमी त्यांनी दिली होती. कसूर झाल्यास निवड रद्द होईल व ग्रामपंचायत सदस्य राहण्यास अपात्र ठरेल, असेही हमीपत्रात सांगितले होते. जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, हे माहीत असूनसुद्धा प्रमाणपत्र सादर केले नाही. यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १०-१ अ अन्वये अपात्र घोषित करावे, अशी शिफारस समितीने केली होती. दोषपात्र दिसून येत असल्याने सदस्य पदाकरिता अपात्र करण्यात येत आहे, असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांच्या स्वाक्षरीसह निर्गमित करण्यात आले आहे.
.....
एक अर्ज नामंजूर
रूपा भामले यांच्यासह रामदास बारसू बोरकर या दाेन सदस्यांबाबत राहुल तागडे यांनी तक्रार केली होती. यापैकी रूपा भामले यांचे सदस्यत्व रद्द झाले. रामदास बोरकर यांच्याविरुद्ध करण्यात आलेला अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यांना पात्र ठरविण्यात आले. बोरकर हे अनुसूचित जाती या जागेसाठी सालई येथून वॉर्ड क्रमांक २ मधून विजयी ठरले होते. बोरकर यांनीसुद्धा विहित मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही, असा आरोप राहुल तागडे यांचा असून, ते त्यांच्या या निर्णयाविरुद्ध राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बोरकर यांनी जात वैधता समिती नागपूरने ८ एप्रिल २०१९ ला निर्गमित केलेले प्रमाणपत्र २३ मार्च २०२० ला सादर केले आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करणे संयुक्तिक होणार नसल्याचाही शेरा अप्पर जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांच्या आदेशात नमूद आहे.