नागपूर - वादग्रस्त जमीन व्यवहारात अडकलेला कुख्यात गुन्हेगार गाैरवसिंग बग्गा याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करून त्याचा २२ जूनपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला.
बग्गाचा साथीदार प्रशांत सहारे याची पत्नी संजीवनीने दिलेल्या तक्रारीनुसार, बग्गाने ११ मे च्या रात्री जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र, बग्गा फरार होता. त्याला दोन आठवड्यांपूर्वी गुन्हे शाखेने आणि नंतर प्रतापनगर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी त्याला कारागृहातून ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे, वाठोड्याच्या जमीन प्रकरणात अडकलेल्या बग्गाला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याची कसून चाैकशी केली असता दुसरी एक खळबळजनक बाजू उघड झाली. त्या बाजूच्या अनुषंगाने पोलिसांनी अद्याप कारवाईची पावलं उचललेली नाही. ती कारवाई झाल्यास अनेक दलालांचा भंडाफोड होऊ शकतो.
----