-- घर झडतीत बनावट दस्तऐवज जप्त
नरेश डोंगरे !
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतमालक आणि त्याच्या मुलाला अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत कोट्यवधीची जमीन हडपल्याप्रकरणी गुन्हेशाखेने अटक केलेला भूमाफिया संजय आनंदराव धापोडकर याने तीनशेवर गोरगरिबांचे कोट्यवधी रुपये हडपल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.
गॅंगस्टर रंजीत सफेलकरसोबत भूमाफिया संजय धापोडकर,
गुड्डू ऊर्फ भास्कर पांडुरंग धापोडकर, राकेश हरिशंकर गुप्ता, नीलेश हेमंत ठाकरे आणि कालू नारायण हाटे यांनी
रवींद्र ऊर्फ रवी नथूजी घोडे (वय ५०, रा. अजनी बुद्रुक) यांची मौजा घोरपड येथील शेती हडपण्यासाठी २००८ मध्ये
अपहरण केले. रवी घोडे आणि त्यांच्या मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्या शेतीवर लेआउट टाकून त्यातील प्लॉट परस्पर विकून टाकले. विशेष म्हणजे, भूमाफिया धापोडकरने कुख्यात सफेलकरची साथ मिळाल्यामुळे काही भ्रष्ट पोलीस आणि पोलिसांशी मधुर संबंध असलेल्या दलालांना हाताशी धरले. त्या बळावर ३०० वर गोरगरिबांना लेआउटमधील प्लॉट विकले. काही दिवसांनी हीच जमीन धापोडकरने त्याच्या चार साथीदारांना चार कोटी रुपयात विकली. जमीन विकत घेणाऱ्यांनीही याच जमिनीवर आपल्या नावाने लेआउट टाकले आणि ते तेथे प्लॉट विक्री करू लागले. अलीकडे या जमिनीतील काही भागात धापोडकरने पुन्हा गुडलक सोसायटीच्या नावाने लेआऊट टाकले आणि तेथे पुन्हा प्लॉट विक्री सुरू केली. आपली फसवणूक झाल्यामुळे अनेक जण न्याय मागण्यासाठी गेले. काहींनी पोलिसांकडे तक्रारीही केल्या. परंतु गुंडांची मोठी फौज आणि दलाल तसेच काही स्वयंकथित नेत्यांचे पाठबळ असल्याने धापोडकरचे काही झाले नाही. मात्र अलीकडे पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी सफेलकर टोळीशी धापोडकर कनेक्ट असल्याचे लक्षात येताच त्याच्या पापाचे खोदकाम केले. त्याला अटक केली. त्याच्या घराची झडती घेतली असता जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली. त्यामुळे आणखी काही गुन्हे धापोडकरविरुद्ध दाखल होण्याचे संकेत मिळाले आहेत.
---
अनेकांना दिलासा
उत्तर नागपुरातील कुख्यात भूमाफिया म्हणून धापोडकर नेहमी चर्चेत असतो. त्याच्यामागे काही भ्रष्ट पोलीस आणि पोलिसांशी सलगी ठेवून असणारे दलाल तसेच गुंडाचे पाठबळ असल्यामुळे धापोडकरविरुद्ध कुणी तक्रार द्यायचे धाडस करत नाही. मात्र या कारवाईमुळे फसगत झालेल्या अनेकांना दिलासा मिळाला आहे.
---
तुम्ही तक्रार द्या, आम्ही न्याय देऊ!
धापोडकरने ज्यांची ज्यांची फसवणूक केली असेल त्यांनी गुन्हे शाखेत येऊन तक्रार करावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त राजमाने यांनी केले आहे. तक्रार मिळाल्यास आणि ती खरी असल्यास पीडितांना न्याय देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असेही उपयुक्त आदमाने यांनी म्हटले आहे.
---