लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कुख्यात गुन्हेगार महेश ऊर्फ गमछू लांबट याची मंगळवारी रात्री जुनी शुक्रवारी परिसरात काही गुन्हेगारांनी भीषण हत्या केली.
नागपुरातील बहुचर्चित मांडवलीकार सुभाष शाहू याच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला आणि नंतर कोर्टाने दोषमुक्त केलेला गमछू अनेक गुन्हेगारांशी संबंध ठेवून होता. गुन्हेगारी क्षेत्रातील पुराना खेळाडू म्हणूनही त्याची ओळख होती. गेल्या काही दिवसांपासून तो जुन्या शत्रूंच्या हिटलिस्टवर आला होता. त्यामुळे त्याचा गेम करण्याची तयारी अनेक दिवसांपासून सुरू होती. मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास गमछू त्याच्या दुचाकीने घरून निघाला. गजानन चाैकाजवळून जात असताना त्याला पाच ते सात गुन्हेगारांनी घेरले. गमछूला बचावाची संधी मिळण्यापूर्वीच आरोपींनी त्याच्यावर घातक शस्त्राचे घाव घालत त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले आणि नंतर दगडाने ठेचले. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या भीषण हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ उडाली. गमछूची हत्या झाल्याचे कळाल्याने गुन्हेगारी वर्तुळातही उलटसुलट चर्चेला उधाण आले. दरम्यान, या हत्येची माहिती कळताच कोतवालीचा पोलीस ताफा, पोलीस उपायुक्त लोहित मतानी, गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने आणि अन्य वरिष्ठांनीही धाव घेतली. वृत्त लिहीस्तोवर मारेकऱ्यांची नावे स्पष्ट झाली नाही. मात्र, गमछूचा गेम सुभाष शाहू हत्याकांडाची कडी असल्याची सर्वत्र जोरदार चर्चा होती.
---
न्यायालयातून सुटला होता
धूर्त गुन्हेगार म्हणून गमछूची ओळख होती. शहरातील कुख्यात मांडवलीकार सुभाष शाहू यांची सप्टेंबर २०११ मध्ये सिनेस्टाइल हत्या झाली होती. एका साधूने प्रसाद म्हणून सायनाइटयुक्त पदार्थ खाऊ घालून सुभाषचा गेम केला होता. दोन वर्षे तपास करूनही पोलिसांना या प्रकरणातील आरोपी सापडले नव्हते. त्यामुळे सुभाष यांच्या नातेवाइकांनी तत्कालीन पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची भेट घेऊन उच्चस्तरीय चाैकशीची मागणी केली होती. तत्कालीन गुन्हे शाखेचे उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांनी या प्रकरणात गमछू आणि साधूचा वेष करणाऱ्या लकी खानला संशयावरून अटक केली. नंतर प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने लकीला या प्रकरणात आजन्म कारावास सुनावला होता, तर गमछूला दोषमुक्त केले होते.
----