लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे आणि मनीष श्रीवास हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि नागपूरचा कुख्यात गँगस्टर रणजित सफेलकरला मंगळवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी सकाळी त्याला जिल्हा न्यायालयासमोर सादर करण्यात आले. यावेळी आकाशवाणी चौकातून न्यायालयापर्यंत पायी नेत पोलिसांनी त्याची वरात काढली. दरम्यान, न्यायालयाने त्याला ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. काही दिवसांपूर्वीच नागपूर पोलिसांनी २०१६ मध्ये झालेल्या एकनाथ निमगडे हत्या प्रकरणाचा उलगडा करत एका अज्ञात व्यक्तीने कुख्यात गँगस्टर रणजित सफेलकरला तब्बल पाच कोटी रुपयांची सुपारी देऊन एकनाथ निमगडे यांची हत्या घडविली होती, असे समोर आणले होते. त्यानंतर पोलिसांनी फरार असलेल्या सफेलकर टोळीतील शरद ऊर्फ कालू हाटे आणि इतर काही गुंडांना अटक केली होती. मात्र टोळीचा म्होरक्या रणजित सफेलकर फरार होता. त्याला काल रात्री पोलिसांनी अज्ञात ठिकाणावरून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. कुख्यात गँगस्टर रणजित सफेलकर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर नागपुरातील इतर अनेक मोठ्या गुन्ह्यांचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
६ सप्टेंबर २०१६ रोजी अग्रसेन चौकाजवळील मिर्झा गल्लीत ७२ वर्षांचे आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. नंतर अनेक वर्षे या प्रकरणाचा उलगडा झाला नव्हता. नुकताच पोलिसांच्या तपासात शेकडो कोटी रुपयांच्या एका जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे पुढे आले आहे. आता सफेलकरला पाच कोटी रुपयांची सुपारी देऊन एकनाथ निमगडे यांची हत्या घडविणारा तो अज्ञात व्यक्ती कोण, याचा उलगडा होण्याची शक्यता बळावली आहे.