लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - बँकेच्या थकीत कर्जदारांची मालमत्ता जप्त करण्याचे काम करणाऱ्या कुख्यात वाहने बंधूंनी अल्प किमतीत भूखंड देण्याचे आमिष दाखवून अनेकांकडून लाखो रुपये उकळले. त्यांची भामटेगिरी उघड झाल्यानंतर रोहनकुमार अजयकुमार सिंग (वय ३३, रा. शंकरनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी प्रतापनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. नरेश राजेश वाहने (रा. आदिवासी सोसायटी, फरस चाैक, झिंगाबाई टाकळी) आणि निलू ऊर्फ विजय राजेश वाहने (रा. सत्यम अपार्टमेंट, जाफरनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
हे दोघेही गुन्हेगारी वृत्तीचे असून ते बँकेचे कर्ज थकलेल्यांच्या मालमत्ता सील करण्याचे काम करतात. अशाच काही मालमत्ता अनेकांना दाखवून त्या स्वस्त किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेकांकडून लाखो रुपये उकळण्याचा सपाटा या भामट्यांनी लावला आहे. १३ ऑक्टोबर २०२० ला त्यांनी प्रतापनगरातील मोक्याचे चार भूखंड रोहनकुमार सिंग यांना दाखवले होते. ते ७२ लाखांत मिळवून देण्याचे आणि ऑनलाईन सेलडीड करून देण्याची थाप मारून त्यांच्याकडून ७२, ४०, २८० रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून घेतले.
---
अखेर बिंग फुटले
विक्रीपत्र करून देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ चालविल्याने सिंग यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी बँक अधिकाऱ्यांकडे चाैकशी केली असता आरोपींचे बिंग फुटले. त्यामुळे सिंग यांनी आरोपींना रक्कम परत द्या अन्यथा पोलिसांकडे तक्रार करेन, असा दम दिला. त्यामुळे आरोपींनी २० लाख रुपये परत केले तर उर्वरित रक्कम परत करतो, असे सांगून टाळाटाळ चालवली. पुढे आरोपींनी अशाच प्रकारे कुणाल पडोळे, पारेंद्र पटले आणि तेलगोटे तसेच अन्य काही जणांकडून सुमारे १ कोटॅ, ६४ लाख, ९० हजार रुपये घेतल्याचे उजेडात आले.
----
पीडितांना देत होते धमक्या
एकीकडे रक्कम परत करण्याचे आमिष दाखवतानाच दुसरीकडे वाहने बंधूंनी ज्यांच्याकडून रक्कम घेतली त्यांना धमक्या देण्याचेही तंत्र अवलंबिले होते. पोलिसांत गेले तर तुमची रक्कमही जाईल, असे ते सांगायचे. त्यामुळे या भामट्यांकडे लाखो रुपये देणारे पोलिसांत तक्रार देण्याचे टाळत होते. मात्र, सिंग यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत माहिती दिली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्याची गंभीर दखल घेत आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, सोमवारी या प्रकरणात प्रतापनगर ठाण्यात आरोपी वाहने बंधूंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींनी अशा प्रकारे अनेकांना गंडा घातल्याचा संशय आहे.
---