आॅनलाईन लोकमतनागपूर : बाळाच्या (मुलगा) नामकरण कार्यक्रमाला कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही, यावरून पती - पत्नीत वाद झाला. त्यातच पत्नी रागाच्या भरात बाळाला सोडून निघून गेली. काही वेळाने तिला बाळ मृतावस्थेत पडले असल्याचे आढळून आले. चौकशीअंती त्या नवजात बाळाला पतीने अर्थात बाळाच्या वडिलांनी कानशीलात थप्पड मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी आरोपी वडिलास अटक केली. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडगाव (आशीर्वाद) येथे शनिवारी घडली.शंकर नरेंद्र ऊर्फ नरेश घोरपडे (२२, रा. खडगाव, ता. कळमेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी वडिलांचे नाव आहे. शंकर व अर्चना यांचा वर्षभरापूर्वी प्रेमविवाह झाला. अर्चनाने १ महिना १५ दिवसांपूर्वी मुलाला जन्म दिला.या नवजात बाळाच्या नामकरण कार्यक्रमाला अर्चनाच्या माहेरच्या मंडळीला बोलावू नये, या कारणावरून शंकर व अर्चना यांच्यात भांडण झाले. त्यामुळे अर्चना रागाच्या भरात बाळाला घरात ठेवून बाहेर निघून गेली. काही वेळाने तिने बाळाला जवळ घेतले असता बाळ तिला मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले.संशय आल्याने अर्चनाने बाळाला सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठले. त्या बाळाची कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता, डोक्याला इजा झाल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी शंकरची आई छाया नरेश घोरपडे (५५, रा. खडगाव) हिला विचारणा केली असता, शंकरने बाळाच्या कानशीलात थप्पड मारल्याचे तिने पोलिसांना सांगितले.परिणामी, कळमेश्वर पोलिसांनी भादंवि ३०४ अवये गुन्हा नोंदवून बाळाचे वडील शंकर घोरपडे यास रविवारी रात्री अटक केली. न्यायालयाने आरोपीला गुरुवारपर्यंत (दि. २१) पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. आर. पाल करीत आहेत.
नागपूर जिल्ह्यात जन्मदाताच ठरला काळ; बारशावरून झालेल्या भांडणात चिमुकल्याने गमावले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:05 PM
नवजात बाळाला वडिलांनी कानशीलात थप्पड मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी आरोपी वडिलास अटक केली. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडगाव (आशीर्वाद) येथे शनिवारी घडली.
ठळक मुद्दे कळमेश्वर तालुक्यातील खडगाव येथील घटना