सुमेध वाघमारे/निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संक्रमित मातेपासून गर्भाला काेणताही संसर्ग हाेऊ शकत नाही, कारण त्यांना जाेडणारा ‘प्लॅसेंटा’ संसर्ग राेखण्यासाठी मजबूत भिंत म्हणून काम करताे. मात्र काेराेनाने हा विश्वास चुकीचा ठरविला. काेराेना संक्रमित मातेकडून तिच्या अर्भकालाही बाधा हाेते. भारतीय संशाेधकांच्या अभ्यासातून हे तथ्य समाेर आले आहे. गंभीर लक्षणे असलेल्या मातांकडून जन्मलेल्यांपैकी ६ टक्के मुले काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आला. यापैकी ९ टक्के चिमुकल्यांचा मृत्यू झाला. (corona infection in pregnancy )
आयसीएमआरअंतर्गत राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य संशाेधन संस्थे(एनआयआरआरएच)ने केलेल्या संशाेधनातून हे निष्कर्ष समाेर आले आहेत. ‘प्रेग-काेविड रजिस्ट्रेशन’ माहिमेंतर्गत हे संशाेधन करण्यात आले. प्रेग-काेविड रजिस्ट्रीचे प्रमुख डाॅ. राहुल गजभिये यांच्या नेतृत्वात डाॅ. राकेश वाघमारे, डाॅ. नीरज महाजन तसेच एनआयआरआरएचच्या माजी संचालिका डाॅ. स्मिता महाले यांच्या समन्वयातून काेराेनाबाधित गर्भवती महिलांबाबत सुरू असलेल्या विविध अभ्यासामधील हेही एक संशाेधन हाेय.
डाॅ. राहुल गजभिये यांनी सांगितले, काेराेनाची पहिली लाट आल्यानंतर गर्भवती महिलांवरील प्रभाव अभ्यासण्यासाठी एप्रिल २०२० पासून अभ्यास सुरू करण्यात आला. राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालये व एक स्वतंत्र अशा १९ सेंटरमध्ये संक्रमित गराेदर महिलांची व्यवस्था करण्यात आली. दुसरी लाट आल्यानंतर जुलै २०२१ पर्यंत ६,५०० गर्भवती महिलांची यादरम्यान नाेंद करण्यात आली व त्यांच्यावर व बालकांवर काेराेनामुळे झालेल्या विविध प्रकारच्या प्रभावांचा अभ्यास करण्यात आला.
यादरम्यान मातेच्या संक्रमणाचे तिच्या गर्भावर आणि बाळावर काही परिणाम हाेतात का, याचाही अभ्यास करण्यात येत आहे. एप्रिल २०२० ते जुलै २०२१ या काळात ५२४ बालकांचा अभ्यास करण्यात आला. यातील ६ टक्के बाळांमध्ये जन्मत:च काेराेनाची लक्षणे आढळून आली. विशेष म्हणजे यातील बहुतेक मुले गंभीर लक्षणे असलेल्या मातांकडून जन्मलेली हाेती. यापैकी ९ टक्के बाळांचा जन्मल्यानंतर काही दिवसातच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे गर्भात असताना मातेच्या प्लॅसेंटा(नाळ)मध्येसुद्धा काेराेना विषाणूचे संक्रमण आढळून आल्याचे डाॅ. गजभिये यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्लॅसेंटामधूनही काेराेनाचे संक्रमण हाेऊ शकते, पण ही बाधा गर्भधारणेनंतर अल्पावधीत (अर्ली स्टेज) म्हणजे प्लॅसेंटा मजबूत हाेण्याआधीच गर्भाला संक्रमण हाेण्याची शक्यता अधिक असल्याचेही डाॅ. राहुल गजभिये यांनी स्पष्ट केले.
२०२० मध्ये नागपूर विभागात १९९९ स्टीलबर्थ
काेराेनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान गर्भातच बाळ दगावल्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले हाेते. २०१९ मध्ये १६०९ तर २०२० मध्ये १९९९ बाळांनी जन्मत:च (स्टीलबर्थ) प्राण गमावला. यात नागपूर सर्वाधिक ५६७, चंद्रपूरला ४४१ तर गडचिराेलीत ३९७ बाळ दगावले हाेते. मातेकडून काेराेनाचे संक्रमण झाल्याचा अंदाज हाेता, पण आता एनआयआरआरएचच्या निष्कर्षामुळे हा अंदाज खरा ठरला आहे.