हिंगणा/कामठी/कळमेश्वर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, काटोल आणि कळमेश्वर तालुक्यात कोरोनाची साखळी अद्यापही कायम आहे. हिंगणा तालुक्यात मंगळवारी ९३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे (४) तर डिगडोह, टाकळघाट, कवडस, कान्होलीबारा, अडेगाव, इसासनी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. हिंगणा तालुक्यात बाधितांची संख्या ३,५८२ इतकी झाली आहे. यातील ३,३५१ रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत ८२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
काटोल तालुक्यात मंगळवारी ८६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील लक्ष्मी नगर, तार बाजार, रेल्वे स्टेशन आणि आयु.डी.पी. परिसरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. ग्रामीण भागामध्ये कोंढाळी,वाढोना आणि मसली येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. कळमेश्वर तालुक्यात पाच रुग्णांची नव्याने भर पडली आहे. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रात ४ तर ग्रामीणमध्ये उपरवाही येथे एका रुग्णाची नोंद झाली.