लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) गुजरात को-आॅपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या बन्सीनगर, हॉटमिक्ससमोर, एमआयडीसी हिंगणा येथील पेढीवर धाड टाकली. धाडीत १.२९ लाख रुपये किमतीच्या १९२८ लिटर निकृष्ट दुधाचा साठा जप्त केला.धाडीदरम्यान अधिकाऱ्यांनी ‘यूएचटी ट्रीटेड होमोजिनस टोन्ड मिल्क’ या अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात येऊन उर्वरित साठा जप्त केला. विश्लेषणासाठी घेतलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. सदर नमुन्याचा अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (अन्न) शरद कोलते यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी महेश चहांदे आणि ललित सोयाम यांनी केली. पुढील काळात सणासुदीच्या दिवसांचा विचार करता खाद्य पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता जास्त असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. ग्राहकांना अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास प्रशासनाला माहिती द्यावी, असे चंद्रकांत पवार यांनी म्हटले आहे.
नागपुरात १.२९ लाखांचा निकृष्ट दुधाचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 7:54 PM
अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) गुजरात को-आॅपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या बन्सीनगर, हॉटमिक्ससमोर, एमआयडीसी हिंगणा येथील पेढीवर धाड टाकली. धाडीत १.२९ लाख रुपये किमतीच्या १९२८ लिटर निकृष्ट दुधाचा साठा जप्त केला.
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई