रियाज अहमद
नागपूर : शहरात लोखंडाच्या पत्र्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या कुलर आणि अलमारीचा व्यवसाय मोठा असला तरी सध्या या व्यवसायाला झळ बसलेली दिसत आहे. परिणामत: व्यवसायाशी संबंधित व्यावसायिक आणि कारागीर संकटात पडले आहेत.
कोरोनाकाळात हा व्यवसाय पूर्णत: बंद होता. अनलॉक प्रक्रियेत तो सुरू झाला. मात्र महागाई आडवी आली. यामुळे या व्यवसायाच्या वेगाला प्रतिबंध बसला. ठोक बाजारात योग्य दर मिळत नसल्याने कारखाना चालक थंडावले आहेत. व्यवसाय कमी होत चालल्याने यावर अवलंबून असलेल्या कारागिरांपुढे समस्या निर्माण झाली आहे.
शहरातील नारा, वांजरा, टेका, वाठोडा, खरबी, मोमिनपुरा, कामठी रोड, मोतीबाग आदी ठिकाणी अलमारी आणि कुलर तयार करण्याचे कारखाने आहेत. विदर्भ, महाराष्ट्रसह मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आदी भागांत हा माल जातो. लोखंडाच्या पत्र्यांपासून अलमारी आणि कुलर तयार केले जातात. वर्धमान नगरातील स्मॉल फॅक्टरी एरिया अलमारी आणि कुलरच्या पत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. ओरिसा आणि छत्तीसगडमधून यासाठी मागणी आहे. व्यावसायिकांच्या मते दोन्ही पत्र्यांच्या किमतीत २० रुपये किलोने वाढ झाली आहे. एक अलमारी तयार करण्यासाठी एक मिस्त्री, एक पेंटर व दोन सहकाऱ्यांसह चार जणांना रोजगार मिळतो.
...
सरकारने हस्तक्षेप करावा
वांजरा येथील कुलर व्यावसायिक हाजी अलीमुद्दीन कल्लू म्हणाले, पत्र्यासोबतच अन्य सुट्या भागांचेही दर वाढले आहेत. उत्पादन खर्च वाढूनही बाजारात वाढीव दर मिळत नाही. यामुळे कारखाने बंद होऊ शकतात. यात सरकारने हस्तक्षेप करावा. मोतीबाग येथील अलमारी व्यावसायिक सलीम शाह वली म्हणाले, मागील दोन महिन्यांत अलमारी तयार होणाऱ्या पत्र्यांच्या किमतीत ४० हजार ते ४५ हजार रुपये प्रति क्विंटल वाढ झाली आहे. कच्चा माल, पेंट, हार्डवेअर सामग्री, ग्लास, कुलूप यातही वाढ झाली आहे. त्यामुळे अलमारी तयार करणे महाग झाले आहे.
...कोट
शेकडोंना रोजगार देणाऱ्या या व्यवसायाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. लोखंडाची निर्यात बंद व्हायला हवी. पत्र्यांचे दर कसे कमी होतील, याचे नियोजन सरकारने करावे.
- राधेश्याम सारडा, माजी अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स
...