चंद्रकांत ठेंगे
नागपूरनुकताच दहावीचा निकाल घोषित झाला. विद्यार्थ्यांना भरभरून गुण मिळाले. अनेकांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले. तर राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले. सद्या आम्ही शिक्षक, विद्यार्थी,पालक, कोचिंग क्लासेस हा आनंद सेलिब्रेट करीत आहोत. कोरोनाच्या काळातील हे काही सुखद क्षण म्हणावे लागतील.हा आनंद सेलिब्रेट करतांना थोडा भूतकाळ आठवला. अगदी २००० पर्यंत ८० ते ९० टक्के मिळविणारा विद्यार्थी राज्यात प्रथम येत असे. ८१ टक्के गुण मिळविणारा मेरीट लिस्ट मध्ये येत असे.आताच्या गुणांचा विचार केला तर ती जुनी हुशारी आज मिरविताना शरम वाटेल. पण जुन्या काळातील गुणांवर अनेक व्यक्ती नामवंत शास्त्रज्ञ म्हणून पुढे आले. कमी टक्के मिळविणारे यशस्वी झाले. कागदावरील संख्या कमी दिसत असली तरी विद्यार्थ्यांमधील गुणात्मक बदल मोठा होता. मग मागील काही वर्षात मिळणाऱ्या टक्केवारीचे प्रमाण वाढले. अचानक मुले हुशार झाली की गुणांचा फुगवटा तयार झाला हा प्रश्न साहजिकच निर्माण होत आहे.
गुणांचा फुगवटा तयार होण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी वाढलेली स्पर्धा, आणि सी बी एस ई चा दहावीचा निकाल या दोन मुख्य बाबींकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे . अनेक वषार्पासून सी बी एस ईचे विद्यार्थी भरपूर गुण मिळवित आले. सी बी एस ई च्या तुलनेत स्टेट बोर्डची निकाल पद्धती कठीण होती. १०० टक्के गुण मिळविणे कठीण होते. मग अकरावी किंवा दहावीच्या आधारावर जिथे प्रवेश असतात तिथे स्टेट बोर्डचे विद्यार्थी मागे पडत असत म्हणून काही वर्षांपूर्वी राज्य शासनाने नवा फॉम्युर्ला आणला आणि त्यातूनच बेस्ट ऑफ फाईव्ह आणि तोंडी परीक्षेचे गुण जन्माला आले.मुळातच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि अन्य परीक्षा मंडळांमध्ये मुलभूत फरक आहे. अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, पाठ्यपुस्तक निर्मिती, अशा सर्वच बाबींमध्ये भिन्नता आहे. मुळात राज्याचे बोर्ड आणि अन्य परीक्षा मंडळांची स्पर्धा होऊ शकत नाही. तशी स्पर्धा नसावीच. मात्र, दुर्देवाने गेल्या काही वर्षांत या सगळ्याची सरमिसळ झाली. त्यातून स्पर्धा सुरू झाली, कोर्टकचेºया झाल्या. त्यातून पुढे 'बेस्ट ऑफ फाइव्ह' आले. १०० गुणांची लेखी परीक्षा ८० गुणांची झाली. जोडीला २० गुणांची तोंडी परीक्षा (गोंडस नाव- अंतर्गत गुण) आली. या सगळयाचा एकत्र परिणाम म्हणज आत्ताचा 'गुण फुगवटा'
बेस्ट ऑफ फाइव मध्ये कमी गुण असलेला विषय वगळून निकाल जाहीर होत आहे. त्यातच क्रीडा , चित्रकला, संगीत आदींचे गुण मिळविले की टक्केवारी १०० होत आहे. शिवाय सोबतीला प्रत्येक विषयात तोंडी परीक्षेचे २० गुण असल्याने गुणांची नव्वदी गाठणे अवघड नाही.परिणामी गुणांचा फुगवटा वाढल्याने आनंदाला उधाण येणे साहजिक आहे. ही उधाणाची भरती अल्पकाळ टिकू नये म्हणून प्रयत्न होणे गरजेचे आहे अन्यथा दहावीत नव्वदी पार करणारे विद्यार्थी बारावीनंतर कितपत यशस्वी होतात हा प्रश्न अनुत्तरितच राहिल. दहावीत मिळालेले गुण आत्मविश्वास वाढविणारे आहेत पण त्यामुळे अहंकार वाढता कामा नये. अन्यथा पाल्यांकडून पालकांच्या अपेक्षा वाढतील आणि बारावीत अपेक्षेनुसार टक्केवारी मिळाली नाही तर आत्मविश्वासाचे रूपांतर नाराजीत होईल. म्हणून पालक, शिक्षक व समाजाने केवळ कागदी गुणावर लक्ष केंद्रित न करता भारताचा आदर्श गुणी नागरिक कसा निर्माण होईल यास्तव प्रयत्न करावा.
मागील काही वर्षांपासून गुणवाढ करण्याकरिता अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यात अनेक तडजोडी सुद्धा आम्ही शिक्षकांनी स्वीकारल्या. एक तडजोड करता करता पुढे आपल्याला अनेक ठिकाणी तडजोडीच कराव्या लागल्या.हे सगळं बदल होत असताना दुसरीकडे नववीपर्यंत अनुत्तीर्ण करायचे नाही असा आदेश आला. त्यामुळे इयत्ता पाचवी ते आठवी आरामगाडी, ढकलगाडी, पांगुळगाडी आणि पुढे नववीमध्ये विद्यार्थ्यांचा आनंदच! शिक्षणतज्ञ, विचारवंतांनी अधोरेखित केलेली आनंददायी शिक्षणाची व्याख्याच आम्ही बदलून टाकली.म्हणूनच म्हणावं वाटते,गुणांचा फुगवटा, नाही आनंदा तोटा...!!!