नागपूर : शालेय पोषण आहारांतर्गत मिळणारे तोकडे अनुदान व वाढती महागाई यामुळे शालेय पोषण आहारातील पोषक घटकच नाहिसे झाले आहे. शासन विद्यार्थ्यांना प्रथिनेयुक्त आहार देत असल्याचा गाजावाजा करीत असले तरी, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची थट्टाच होत आहे. शाळांमध्ये अॅडजेसमेंटच्या नावावर पोषण आहार सुरू असला तरी, मुख्याध्यापकांची यात चांगलीच गोची होत आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उष्मांक व प्रथिनेयुक्त पोषण आहार देण्यात येतो. ग्रामीण भागातील शाळांना तांदळासोबत इतर धान्याचा पुरवठा करण्यात येतो. हे धान्य शिजविण्यासाठी लागणारे इंधन आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. या अनुदानाच्या रकमेत नुकतीच वाढ करण्यात आली आहे. आता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा आहार शिजविण्यासाठी प्रतिविद्यार्थी १.४३ व ६ ते ८ वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी १.९३ इतका खर्च देण्यात येत आहे. शहरी भागात शासनातर्फे केवळ तांदळाचा पुरवठा करण्यात येतो. उर्वरित डाळी, मसाले, तेल, इंधन यासाठी अनुदान देण्यात येते. १ ते ५ वर्गासाठी ३.६७ व ६ ते ८ वर्गासाठी ५.४६ रुपये दिले जातात. सध्या डाळ, तेल, मसाले यांच्यासोबतच भाज्यांचे दर प्रचंड वाढले आहे. इंधनासाठी वापरल्या जाणारा गॅसच्या किंमती वाढल्या आहे. ग्रामीण भागात १० विद्यार्थ्यांमध्ये १४ रुपये अनुदान मिळते. यात भाज्या व इंधनावर खर्च होतो. तर शहरात १० विद्यार्थ्यांमागे ३६ रुपये अनुदान मिळते त्यात तांदूळ सोडल्यास सर्वच साहित्य खरेदी करावे लागते.
पोषण आहाराला महागाईचा फटका
By admin | Published: August 06, 2016 2:43 AM