लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे देशात डिझेलच्या किमती अशाच वाढत राहिल्यास भविष्यात महागाई उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवर महागाईचा भार येणार आहे. डिझेलच्या किमती वाढल्यामुळे वाहतूकदारांची चिंता वाढली असून मालवाहतूक क्षेत्रात मंदी आहे.डिझेलच्या वाढीव दरामुळे मालवाहतुकीवर परिणामकर्नाटक विधानसभा निवडणुकीत तब्बल १९ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर होत्या. १५ मेपासून दरदिवशी किंमत वाढत आहे. पण वाहतूकदार वस्तूंची वाहतूक प्रति लिटर ६२ ते ६५ रुपये दरानेच करीत आहे. मध्यंतरी मालवाहतुकीचे भाडे वाढविले तेव्हा व्यावसायिकांनी वाढीव भाडे देण्यास विरोध केला होता. आता धान्य आणि कोळशाची वाहतूक रेल्वेने होत असून लोखंड, लाकूड व सिमेंटच्या भरवशावर ट्रक धावत आहेत. पण सध्या देशात मंदीचे वातावरण आहे. वाहतूकदारांचे ५० टक्के ट्रक जागेवर उभे आहेत. उत्पन्न कमी झाले आहे, बँकांचे हप्ते वाढत आहेत. महागाईत भर टाकणाऱ्या काळात सरकारने डिझेलचे दर वाढवू नये, अशी मागणी वाहतूकदार संघटनांनी लोकमतशी बोलताना केली.ट्रक वाहतूकदार संकटातसध्या सरकारने रस्ते व रेल्वे मार्गाने बल्क वाहतुकीवर भर दिला आहे. त्यामुळे कंटेनरने मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक होत आहे. हिंगणा व बुटीबोरी एमआयडीसीतून कंटेनरने मालाची वाहतूक होते. पण औद्योगिक मंदीमुळे मालवाहतूक अर्ध्यावर आली आहे. ट्रक वाहतूकदार सर्व बाजूने संकटात आले आहेत. याशिवाय सरकारचे कठोर नियम आणि विविध कर त्यात भर घालत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असतानाही सरकार अनावश्यक कर वसुली करून डिझेलचे भाव वाढवित होते. सरकारने वाहतूकदारांसाठी काहीही सकारात्मक पावले उचलली नाहीत वा कोणत्याही मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत, असा आरोप वाहतूकदार संघटनांचा आहे.विद्यार्थ्यांचा प्रवास होणार महागशाळा जूनमध्ये सुरू होणार आहे, पण पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे व्हॅनचालक आणि शाळा संचालकांनी बसमधून प्रवास करणाºया विद्यार्थ्यांचे शुल्क आतापासूनच वाढविले आहे. हे शुल्क तिमाही फीसोबत शाळा संचालक आकारत आहेत. शिवाय खासगी बसचालकांनी भाडे तब्बल २० टक्क्यांनी वाढविले आहे. याशिवाय सार्वजनिक एसटी बस सेवेचे तिकिट १५ ते २० टक्के वाढविण्याचे संकेत मंत्र्यांनी दिले आहेत. तसेच रिक्षाचालकांनीही भाडे वाढविले आहे. सोशल मीडियावर दरवाढीचा निषेध करीत महागाई कमी करण्याच्या गप्पा मारणाºया मोदी सरकारची खिल्ली उडविली जात आहे. दिवसेंदिवस वाढत असणाºया पेट्रोल व डिझेलच्या दराचा फटका सर्व स्तरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने अनावश्यक लादलेले कर कमी केल्यास दरवाढीपासून नागरिकांना दिलासा मिळेल, असे वाहतूकदारांचे मत आहे.डिझेल दरवाढीमुळे मालवाहतूक ठप्पनोटाबंदी, जीएसटी, ई-वे बिल आदींमुळे मंदीत असलेली मालवाहतूक डिझेल दरवाढीमुळे ठप्प झाली आहे. नागपुरात ट्रक व्यवसायाशी जुळलेले कामगार बेरोजगार झाले आहेत. शिवाय मालवाहतूकदारांना बँकेचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. ट्रकचा विमा वाढला आहे. सरकारने ट्रकवर आयकराची आकारणी सुरू केली आहे. पंपांवर रॉकेलची भेसळ होत आहे. अशा अनेक समस्यांतून वाहतूकदारांची वाटचाल सुरू आहे. सरकार काँग्रेसचे असो वा भाजपाचे, आंदोलनादरम्यान केवळ आश्वासन देतात. आतापर्यंत कुणीही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मालवाहतूक हा मोठा व्यवसाय असून सरकारला मोठा कर मिळतो. दिल्ली येथील आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्टने २० जुलैला देशात संपाचे आयोजन केले आहे. त्यात नागपूर ट्रकर्स युनिटी भाग घेणार आहे.कुक्कू मारवाह, अध्यक्ष नागपूर ट्रकर्स युनिटी