लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आला आहे. यामुळे ७० टक्केहून अधिक वेगाने संसर्ग होण्याची शक्यता आहे. याचा विचार करता खबरदारी म्हणून ब्रिटनसह युरोप, दक्षिण आफ्रिका, मिडल ईस्ट आदी देशातून मागील एक महिन्यात परतलेल्या प्रवाशांनी महापालिका प्रशासनाला माहिती आवश्य द्यावी. असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
नागरिकांचे हित लक्षात घेता ही माहिती लपवू नये, जागरूक नागरिकही विदेशातून परतलेल्या नागरिकांची माहिती देऊ शकतात. जे प्रवासी विदेशातून आले आहेत. त्यांनी कोविड कंट्रोल रुमचा फोन क्रमांक ०७१२-२५६७०२१ अथवा ई-मेल एडीडीआयएमसी सर्व्हिसेस जीओवी डॉट या यावर माहिती द्यावी. जागरूक नागरिक, विदेशी ट्रॅव्हल एजंट, फॉरेन करंसी एक्सचेंजशी संबंधित विदेशातून परतलेल्या नागरिकांची माहिती देऊ शकतात. कोराेना नियंत्रणासाठी सर्वांना एकजुटीने प्रयत्न करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांच्यावर दिली आहे.
संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांची कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल.
......
रात्रीची संचारबंदी लागू
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचे आदेश जारी केले. नागपुरात रात्री ११ पासून पहाटे ६ पर्यत कर्फ्यू राहील. ५ जानेवारीपर्यंत हा आदेश लागू राहील.