नागपूर : कोराडीतील प्रस्तावित ६६० मेगावॅटच्या २ औष्णिक वीज प्रकल्पांना विरोध करण्यासाठी ९ ऑगस्टला क्रांतिदिनी दुपारी एक वाजता संविधान चौकातून ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत लाँग मार्च काढून त्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यात येईल, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप येथील वेद नंदिनी कृषी पर्यटन स्थळी होऊन त्यात कोराडीतील वीज प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ॲड. चटप म्हणाले, शासनाने १ एप्रिलपासून वीज बिलात ३७ टक्केपर्यंत २ टप्प्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयालाही आंदोलनात विरोध करण्यात येईल.
विदर्भात हवेतील प्रदूषण वाढल्याने नागरिकांना दमा, अस्थमा, खोकला, टीबी असे श्वसनाचे आजार होत आहेत. त्यात कोराडीत आणखी दोन वीज प्रकल्प आणल्यास नागरिकांचे जगणे असह्य होणार आहे. तसेच चंद्रपूरमध्येही वाढलेल्या प्रदूषणाबाबत आणि वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलनात आवाज बुलंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. श्रीनिवास खांदेवाले, रंजना मामर्डे, अरुण केदार, युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, प्रा. प्रभाकर कोंडबत्तूनवार, तात्यासाहेब मते, नरेश निमजे आदी उपस्थित होते.