लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळेतील चवथी ते दहावी, हे वय अभ्यासाचेच. खरे सांगायचे तर खेळण्या-बागडण्याचे. मात्र, उज्ज्वल भविष्याच्या अट्टहासात त्यावर विरजण पडते आणि मुले सतत पुस्तकात डोकावलेली असतात. अशा काळात विहीरगाव येथील प्रेरणा पब्लिक स्कूलच्या शिक्षकांनी मुलांच्या कल्पकतेला वाव देत, त्यांच्याकडून कॅनव्हॉस रंगवण्याची किमया साधली. त्याच किमयेचे ‘प्रेरणा कॅनव्हॉस पेंटिंग कार्निव्हल’ जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. या द्विदिवसीय कार्निव्हलचे उद्घाटन शनिवारी झाले.शाळेचे संस्थापक एस.सी. गुल्हाने, आर.सी. गुल्हाने व सीईओ अभिलाषा गुडधे यांच्या हस्ते करण्यात आले. कलाशिक्षक सुरेंद्र टाले व प्रणिता भेंडे यांच्या मार्गदर्शनात व प्राचार्य डॉ. सॅम्युअल रॉय आणि शाळा संस्थापक सुरेंद्र गुल्हाने यांच्या प्रोत्साहनातून अभ्यासाच्या तणावातून मनाला तजेला देणाऱ्या कलाकृती साकारण्याची लीला मुलांनी साधली. जवळपास १६० विद्यार्थ्यांनी कॅनव्हॉसवर कल्पनांना विविध रंगछटांची संगत दिली आणि मधुबनी, कालमकारी, क्रिएटिव्ह, लॅण्डस्केप, झिरोलाईन, पोर्ट्रेट, अॅब्स्ट्रॅक्ट, फ्रीहॅण्ड, नेचर, शॅर्डा अशा विविध शैली कॅनव्हॉसवर रेखाटल्या. मुलांच्या या कलाकुसरी बघून त्यांच्यातील कल्पकतेला कशा तऱ्हेने चालना मिळत गेली असेल, याची जाणीव आपसूकच होते. वर्षभर ‘आर्ट अॅण्ड क्राफ्ट’च्या तासिकेत मुले स्वत:च्या अभिव्यक्तीला बेमालूम मोकळीक देत असत आणि त्यातून साकारलेल्या या कला जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये झळकाव्यात, असे शाळेचे स्वप्न होते. त्याच स्वप्नांची पूर्तता होत असल्याचे कला शिक्षक सुरेंद्र टाले व प्रणिता भेंडे यांनी सांगितले. चित्रांचे हे प्रदर्शन रविवारपर्यंत सुरू असणार आहे.
विद्यार्थ्यांनी कॅनव्हॉसवर रेखाटली कल्पकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 10:35 PM
विहीरगाव येथील प्रेरणा पब्लिक स्कूलच्या शिक्षकांनी मुलांच्या कल्पकतेला वाव देत, त्यांच्याकडून कॅनव्हॉस रंगवण्याची किमया साधली. त्याच किमयेचे ‘प्रेरणा कॅनव्हॉस पेंटिंग कार्निव्हल’ जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे.
ठळक मुद्देप्रेरणा कॅनव्हॉस पेंटिंग कार्निव्हल : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत प्रदर्शन