लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयसोलेशन वॉर्डसाठी आवश्यकता पडली तर मोमीनपुरा येथील मोठी मशीद (जामा मशीद)चा वापर करावा, अशी विनंती मशीद कमिटीतर्फे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना निवेदनाद्वारे केली आहे. मशीद कमिटीने हा पुढाकार घेत एक नवीन आदर्श घालून दिला आहे. याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.मोमीनपुरा, मोहम्मद अली रोड येथील जामा मशीदचे चेअरमन एम. एच. रहमान आणि सचिव साजिद अनवर यांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना सोपवण्यात आले आहे. हे पत्र पोलीस आयुक्तांनाही सादर करण्यात आले आहे. पत्रात म्हटले आहे की, कोरोना विरुद्धच्या लढाईत मुस्लीम समाज पूर्णपणे प्रशासनासोबत उभा आहे. याअंतर्गत जामा मशीदच्या बेसमेंटचा उपयोग ‘आयसोलेशन वॉर्ड‘म्हणून करण्यास तयारी दर्शविली. ५ हजार वर्गफूटाचे हे बेसमेंट यासाठी अतिशय चांगले राहील, असेही सांगितले. यासोबतच गरज पडलीस तर क्वारंटाईन किंवा आयसोलेशनसाठी मोमीनपुरा येथील इतरही मशिदी आणि मदरसातील खोल्यासुद्धा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.यासंदर्भात मशीद कमिटीचे चेअरमन एम.एच. रहमान आणि सचिव साजीद अनवर यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भातील पत्र सादर करण्यात आले आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी या पुढाकाराचे कौतुक केले असून सध्या याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. परंतु गरज पडलीच तर याचा निश्चित वापर केला जाईल, असेही सांगितले. सध्या शहराबाहेरच्या जागांना प्राथमिकता दिली जात आहे.
मशीदच्या इमाम साहेबांशी मुख्यमंत्र्यांनी साधला होता संवादकाही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोमीनपुरा येथील जामा मशीदचे इमाम अब्दुल खलिक यांच्याशी मोबाईलवर संवाद साधला होता. त्यात झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना कोरोनाच्या या लढाईत सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. इमाम साहेबांनी सुद्धा या लढाईत मुस्लीम समाज पूर्णपणे सहकार्य करेल, अशी हमी दिली होती. आयसोलेशन वॉर्ड व क्वारंटाईन सेंटरसाठी मशीद वापरण्यासाठी घेतलेला पुढाकार हा त्याचाच एक भाग असून या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.