लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अयोध्येत राममंदिराची निर्मिती व्हावी, यासाठी वातावरणनिर्मिती करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विविध संघटनांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात २५ नोव्हेंबर रोजी नागपुरात आयोजित हुंकार सभेसाठी सखोल नियोजन सुरू आहे. या सभेसाठी विदर्भातील संत तसेच मान्यवर मंडळींनीदेखील पुढाकार घेतला असून, ‘सोशल मीडिया’वरून जनतेला सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.राममंदिरासाठी वातावरणनिर्मिती करण्यासाठी अयोध्या, बंगळुरू व नागपुरात हुंकार सभा होणार आहेत. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने येथून देशात संदेश जाणार आहे. येथे जास्तीत जास्त प्रमाणात नागरिक यावे यासाठी संघ परिवारातील विविध संघटनांतून ‘सोशल मीडिया’वरदेखील वातावरणनिर्मिती सुरू आहे. याअंतर्गतच विदर्भातील संत तसेच मान्यवर मंडळींनीदेखील आवाहनाचे ‘व्हिडीओ’ टाकले आहेत.या संतांमध्ये संत उच्चाधिकार समितीचे सदस्य व श्रीदेवनाथ मठ (सुर्जी-अंजनगाव) श्रीनाथ पीठाधीश्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज, ‘बीएपीएस’ स्वामीनारायण संस्थेचे वरिष्ठ संत साधू प्रेमप्रकाश दासजी, भागवताचार्य हभप श्रीराम महाराज जोशी यांचा समावेश आहे. सोबतच राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, माजी खासदार अजय संचेती, विश्वमांगल्य सभेच्या अखिल भारतीय संघटन प्रमुख डॉ. वृषाली जोशी, शिवकथाकार सुमंत टेकाडे, परमात्मा एक सेवक आध्यात्मिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू मदनकर यांनी केलेल्या आवाहनाचे ‘व्हिडीओ’देखील ‘सोशल मीडिया’वर दिसून येत आहेत.
राममंदिर देशाच्या स्वाभिमानाचा मुद्दा : शांताक्काराम हे भारताचे आराध्यदैवत आहे. अयोध्येत त्यांचे भव्य मंदिर व्हावे ही कोट्यवधी जनतेची अपेक्षा आहे व हा देशाच्या स्वाभिमानाचा मुद्दा आहे. यासाठी सर्वांनी एकत्रपणे हुंकार देण्याची आवश्यकता आहे. आत्मविश्वासाने सर्व एकत्र आले तर नक्कीच राममंदिराची निर्मिती होईल, असा विश्वास राष्ट्रसेविका समितीच्या संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केला.राममंदिरासाठी कायदा करा : जितेंद्रनाथ महाराजजगभरातील हिंदूंच्या आस्था, श्रद्धा, भावनांशी जुळलेला हा विषय आहे. राममंदिर निर्मितीसाठी खूप प्रतीक्षा झाली आहे. राममंदिर उभारण्यासाठी संत-महंतांसह जनता पुढाकार घ्यायला तयार आहेत. जनमानसाची भावना लक्षात घेऊन केंद्र शासनाने राममंदिरासाठी अध्यादेश काढला पाहिजे व कायदादेखील केला पाहिजे, अशी मागणी आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी केली.