ठळक मुद्देराष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगातर्फे शांती परिषद : जगभरातील बौद्ध प्रतिनिधींसोबत चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी बौद्ध समाजातर्फे अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात सुलेखा कुंभारे यांनीही अनेक आंदोलने केली आहेत. आता त्या स्वत: राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य आहेत. बौद्ध धर्म हा अल्पसंख्यक आहे. त्यादृष्टीने आयोगाच्या मार्फत बौद्ध नागरिकांची ही अतिशय जुनी मागणी कायदेशीररीत्या सुटावी, यासाठी सुलेखा कुंभारे या पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत.रविभवन येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी याबाबतचे संकेत दिले. येत्या २८ एप्रिल रोजी महाबोधी महाविहार परिसरात आंतरराष्ट्रीय बौद्ध शांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने आयोजित केली, हे विशेष. या परिषदेमध्ये जगभरातील बौद्ध राष्ट्रांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या परिषदेत संपूर्ण राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग उपस्थित राहील.आपण या आंदोलनाशी आधीपासून जुळले असल्याने त्यांच्या मागण्या आपल्याला माहीत आहेत. परंतु नव्याने सर्वांशी चर्चा करून ती ऐकली जातील. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे टेम्पल अॅक्टमध्ये बदल करण्याची गरज आहे. येथील मंदिराच्या व्यवस्थापनात एकूण नऊ सदस्य आहेत. यात चार सदस्य हे बौद्ध आणि चार सदस्य हे हिंदू आहेत. तर अध्यक्ष हा जिल्हाधिकारी राहतो जिल्हाधिकारी हा हिंदू असावा, अशी त्यात अट आहे. ही अट रद्द करणे आणि व्यवस्थापनात सर्वच सदस्य हे बौद्ध असावे, ही मागणी आहे. यासंबंधात आयोग आपल्यापरीने एक अहवाल तयार करून सरकारला तो सादर करेल. याशिवाय मागील काही दिवस महाबोधी महाविहारावर दहशतवादी हल्ला झाला आहे. त्यादृष्टीने सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्या आणि जगभरातील बौद्ध लोक येथे दर्शनाला येतात तेव्हा पर्यटकांच्या दृष्टीने विकास कामे करावीत, अशी मागणीही यात जोडण्यात येणार असल्याचे सुलेखा कुंभारे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला नगरसेविका वंदना भगत, भीमराव फुसे आदी उपस्थित होते.