लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : म्युकरमायकोसिस(ब्लॅक फंगस)च्या उपचारासाठी आवश्यक असणारे एमफोटेरेसिन बी इंजेक्शनचे उत्पादन वर्ध्यानंतर आता नागपुरातही होईल. अन्न व औषधी प्रशासन विभागाने(एफडीए)हिंगणा येथील युनीजूल्स लाईफ सायन्सेस लि. या कंपनीला याच्या उत्पादनाची मंजुरी प्रदान केली आहे. दुसरीकडे अजूनही म्युकरमायकोसिस औषधाच्या तुटवड्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सोसावा लागत आहे.
एफडीएच्या नागपूर विभागाचे सहआयुक्त विजय कोसे यांनी ही माहिती दिली. नागपुरातही उत्पादन झाल्याने विदर्भात या इंजेक्शनचा पुरवठा वाढेल. यापूर्वी वर्धा येथील कंपनीला रेमडेसिविरनंतर म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शन उत्पादनाचीही मंजुरी देण्यात आली होती. सध्या महाराष्ट्रात केवळ अंबरनाथ येथील भारत सीरम ही कंपनी एमफोटेरेसिन बी इंजेक्शन तयार करत आहे. सूत्रानुसार नागपुरातील कंपनीला उत्पादनाची मंजुरी मिळाली असली तरी यासाठी लागणारा कच्चा माल हा जर्मनीमधून आयात करावा लागतो. कच्चा माल उपलब्ध झाल्यावरच कंपनी इंजेक्शनचे उत्पादन सुरू करू शकेल. त्यामुळे एका महिन्याच्या आत उत्पादन सुुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान शहरात या इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहे. सूत्रानुसार गेल्या शनिवारी नागपूरला ३०० इंजेक्शन मिळाले होते. पाहता पाहता हा साठा संपला. रविवारपासून इंजेक्शनचा पुरवठाच झालेला नाही. लवकरच पुरवठा होईल, अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे प्रचंड तुटवडा असूनही जिल्हा प्रशासनाने या रेमडेसिविरप्रमाणे म्युकरमायकोसिस औषधांना आपल्या नियंत्रणात घेतलेले नाही.
दाेन ऑक्सिजन प्लांटही मंजूर
शासकीय रुग्णालयाशिवाय एफडीएने खाासगी क्षेत्रात दोन ऑक्सिजन प्लान्टला मंजुरी प्रदान केली आहे. सहआयुक्त काेसे यांच्यानुसार, बुटीबोरी येथे ८ मेट्रिक टनचा रिफिलिंग प्लांट व वर्धा येथे ४ मेट्रिक टन ऑक्सिजनच्या उत्पादन प्लांटला मंजुरी देण्यात आली आहे. यानंतर विभागात ऑक्सिजनचा कुठलाही तुटवडा राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.