नागपूर : अन्य मगरीच्या हल्ल्यात जखमी झाल्याने पाय तुटलेल्या महाराजबागेतील मगरीला उपचारानंतर आता ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील आयसीयूमध्ये दाखल केले आहे. सुमारे १० दिवसांपूर्वी ती जखमी झाली होती.
येथील महाराजबाग प्राणिसंग्रहालयात काही मगरी आहेत. यातील दोन मगरींची एकमेकांना खाण्यासाठी झटापट झाली असता दुसरी गंभीर जखमी झाली होती. तिचा पाय तुटला होता. त्यामुळे ती बऱ्याच दिवसांपासून जखमी होती. सोमवारी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर तसेच महाराजबागेच्या कर्मचाऱ्यांनी तिला पकडून उपचारासाठी सेंटरमध्ये आणले. तपासणी व एक्स-रे काढून डॉ. सय्यद बिलाल अली यांनी उपचार केले; परंतु जखमा बऱ्याच जुन्या असल्याने व एक पाय तुटला असल्याने तिला परत महाराजबागेत पाठविणे धोकादायक होते. त्यामुळे ट्रान्झिट सेंटरलाच आयसीयूमध्ये दाखल करून घेतले. उपचाराच्या वेळी महाराजबागचे प्रभारी डॉ. सुनील बावसकर व पशुपर्यवेक्षक डॉ. रोहिणी टेंभुर्णे व सिद्धांत मोरे तसेच वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हाते उपस्थित होते.