नागपूर : कामठी रेल्वेस्थानकाजवळ एक दुर्मिळ पक्षी रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पडून होता. गस्तीवर असलेल्या लोहमार्ग पोलिसांनी प्रथमोपचार करून त्यास वन विभागाकडे सोपविले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी ४.३० वाजता कामठी रेल्वेस्थानकाजवळ घडली.
इतवारी लोहमार्ग ठाण्यातील पोलीस शिपाई अनिल यादव, आशिष गोडबोले आणि हवालदार दिलीप भदोरिया हे कामठी रेल्वेस्थानक परिसरात गस्त घालत होते. काही वेळात विदर्भ एक्स्प्रेस येऊन ती नागपूरच्या दिशेने निघाली. त्यानंतर पाच मिनिटात गस्त घालत असताना लोहमार्ग पोलिसांना रेल्वे रुळावर एक पक्षी जखमी अवस्थेत दिसला. त्याला उडता येत नव्हते. त्यांनी या पक्ष्याला जवळ घेऊन त्याच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर वन विभागाच्या पथकाला माहिती देण्यात आली. बचाव पथकाचे बोरकर आपल्या पथकासह कामठी रेल्वेस्थानकावर पोहोचले. त्यानंतर या पक्ष्याला वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई इतवारीचे सहायक उपनिरीक्षक मुबारक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जखमी पक्ष्याचे नाव ब्लॅट विंग काईट असल्याचे वन विभागाच्या पथकाने सांगितले.
..............