काटोल : काटोल-सावरगाव रोडवर अपघात ही नवी बाब नाही. लॉकडाऊनमुळे येथील वर्दळ कमी झाल्याने वर्षभरात या मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी झाले होते. आता लॉकडाऊमध्ये शिथिलता मिळताच या मार्गावरील वर्दळ वाढली आहे. या मार्गावर रविवारी सायंकाळी दुचाकीला कट लागल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. यानंतर या परिसरातील गुन्हे शाखेच्या पोलिसांना ही बाब लक्षात येताच त्यांनी जखमी व्यक्तीला तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काटोलच्या आयूडीपी येथील गोविंद धोटे (वय ५६) हे दुचाकीने सावरगाव मार्गे काटोलकडे येत होते. सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास मागून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या गाडीला कट मारली. यात ते जमिनीवर कोसळले. याच मार्गावरून पोलिसांची गाडी मागे होती. पोलिसांना अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जखमी गोविंद धाटे यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्यांच्या नातेवाइकांनाही माहिती दिली. धोटे यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. नागपूर ग्रामीण गुन्हे शाखेतील हेड कॉन्स्टेबल राजेंद्र सनोडिया, एस. पराडे, अझीझ शेख यांनी धोटे यांचे प्राण वाचविण्यासाठी दाखविलेल्या तत्परतेबाबत कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.