नागपूर : सत्र न्यायालयाने शैलेश कंगाली खून प्रकरणातील आरोपी बंधू पवन व कार्तिक नरेंद्र गायकवाड यांना संशयाचा लाभ देऊन निर्दोष सोडले. न्या. पी. एफ. सय्यद यांनी हा निर्णय दिला.
आरोपी हे धंतोली पोलिसांच्या हद्दीमधील राहुल नगर झोपडपट्टी येथील रहिवासी असून कंगालीही तेथेच रहात होता. घटनेच्या दिवशी आरोपी पवनने जितेंद्र दुपारेला थापड मारली होती. त्यामुळे जितेंद्र, त्याचे वडील सुदर्शन व कंगाली हे पवनला समजावण्यासाठी गेले. दरम्यान, दोन्ही आरोपींनी त्यांच्यावर कोयता व सत्तुरने हल्ला केला. कंगालीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. जितेंद्र व सुदर्शनलाही विविध ठिकाणी जखमा झाल्या अशी पोलीस तक्रार होती. न्यायालयात आरोपींच्या वतीने ॲड. आर. के. तिवारी यांनी बाजू मांडली. साक्षीदारांच्या बयानात विसंगती आहे. सुरुवातीला मयत व जखमींनी आरोपींवर हल्ला केला होता. त्यामुळे आरोपींनी मयताचा ढालीसारखा उपयोग केला. त्यात तो जखमी झाला हे मुद्दे ॲड. तिवारी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने आरोपींना निर्दोष सोडताना यासह विविध बाबी लक्षात घेतल्या.