नागपूर : देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ऊर्जा विभागातील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. यावर एक महिन्यात नव्हे तर १५ दिवसात चौकशीचा अहवाल यायला हवा’, असे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट करीत पलटवार केला.
बावनकुळे म्हणाले, राज्य सरकारने सर्व तपास यंत्रणांची मदत घेऊन १ डिसेंबरच्या पूर्वी आपला अहवाल सादर करायला हवा. जेणेकरून नागरिकांनाही याची माहिती होईल की, फडणवीस यांच्या कार्यकाळात ऊर्जा विभागात किती कामे झाली आहेत. ते म्हणाले, एक वर्षापूर्वीसुद्धा राज्य सरकारने चौकशी करण्याची घोषणा केली होती. तेव्हासुद्धा सर्व तपास यंत्रणांची मदत घेऊन १५ दिवसात चौकशी करण्याचे आव्हान आपण दिले होते. परंतु कुणीही पुढाकार घेतला नाही. फडणवीस यांच्या कार्यकाळात ऊर्जा विभागाचे कामकाज सर्वश्रेष्ठ होते, असा दावाही त्यांनी केला. त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक आमदारांनीही विधानसभा सभागृहात ऊर्जा विभाग सर्वात चांगले काम करीत असल्याचे म्हटले होते, असेही त्यांनी सांगितले.
भाजप विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडी सरकारचे भ्रष्टाचार उघडकीस आणत आहे. त्यामुळे सत्तापक्ष बदल्याच्या भावनेतून मागच्या सरकारच्या कामावर प्रश्न उपस्थित करून विरोधी पक्षाला शांत करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु ते यशस्वी होऊ शकणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.