जलालखेडा : नरखेड तालुक्यातील नारसिंगी-नायगाव (ठाकरे) गट ग्रामपंचायतमध्ये भोंगळ कारभार सुरु आहे. परस्पर पैशाची उचल केल्याचा आरोप उपसरपंच व सदस्य यांनी केला आहे. या बाबतची तक्रार त्यांनी गट विकास अधिकारी,नरखेड यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे. या ग्रा.पं.मध्ये गत १३ महिन्यांपासून संगीत धुरडे सचिव म्हणून कार्यरत आहेत. परंतु तेरा महिन्यांपासून त्यांनी सदस्यांची मासिक सभा घेतली नसल्याचा आरोप उपसरपंच व सदस्यांनी केला आहे. ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कोणत्याही कामाकरिता सदस्याची परवानगी न घेताच कामे सरपंच व सचिव यांनी परस्पर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. २०१९ मध्ये पाणीटंचाई असल्यामुळे विहिरीचे खोलीकरण करण्यात आले होते. विहिरीला मोठ्या प्रमाणात पाणी लागल्यामुळे काही कामे शिल्लक राहिलेली होती. परंतु राहिलेले काम न करताच सरपंच व सचिव यांनी २०२० मध्ये पैसे उचलून पैशाचा दुरुपयोग केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. २०२० मध्ये नवीन पाईपलाईनचे काम करण्यात आले असून ते काम मासिक सभेची परवानगी न घेता करण्यात आली आहे. नवीन अंगणवाडीचे बांधकाम २०१७ मध्ये झाले असताना त्यांची दुरुस्ती २०२० मध्येच कशी, असा प्रश्न सदस्यांनी केला आहे. तसेच दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढण्यात आल्याचा आरोपसुद्धा करण्यात आला आहे. दलित वस्तीचे कामसुद्धा निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. सामान्य फंड व पंधरावा वित्त आयोग या मधून झालेल्या खर्चाचे कॅश बुक, पासबुक कधीही मासिक सभेत दाखवण्यात आले नाही किंवा सदस्यांनी मागणी करूनसुद्धा त्यांना माहिती देण्यात आली नाही, असे आरोप गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून उपसरपंच मनोहर तायवाडे, ग्रामपंचायत सदस्य घनश्याम ठाकरे, सुनील बारई, संगीत काळे, दीपाली पराये, प्रतिभा पाचपोहर, चंद्रकला महंत यांनी केले आहेत.
..................गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देताना नारसिंगी गट ग्राम पंचायत येथील उपसरपंच व सदस्य.