लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अधिकृत डान्स बारच्या परवान्याचे घोंगडे अद्याप भिजत पडले असताना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑर्केस्ट्राच्या आडून चक्क डान्स बार सुरू असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या बारमध्ये जाऊन आज दिवसभर चौकशी केली.चार महिन्यांपूर्वी बुटीबोरीत एका बुकीने ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार सुरू केला. प्रारंभी तो अधूनमधून बारबालांना नाचवत होता. डान्सरवर आंबटशौकीन नोटांची उधळण करीत असल्यामुळे आणि पोलिसांकडून कसलीही कारवाई होत नसल्यामुळे बुकी चांगलाच निर्ढावला. त्याने परवाना मिळाल्याच्या आविर्भावात बारबालांना तेथे नियमित नाचविणे सुरू केले. या डान्स बारमधील क्लीप व्हायरल झाली. पैशाच्या जोरावर धनिक मंडळींनी बार डान्सरशी चालविलेली लगट आणि डान्सर्सवर केली जाणारी नोटांची उधळण व्हायरल झालेल्या क्लीपमध्ये स्पष्ट दिसत आहे. आंबटशौकिन ग्राहक बार डान्सरसोबत आक्षेपार्ह प्रकार करीत असल्याचेही त्यात दिसत आहे. लोकमतने सोमवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. महसूल विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लोकमतच्या वृत्ताची दखल घेत बारमध्ये आपापली पथके तपासासाठी पाठविली. परवाना देणाऱ्या हिंगणा तहसीलदाराने दिवसभरात काय चौकशी केली, ते कळायला मार्ग नाही. मात्र, उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आपल्या अधिकारात येत असलेल्या बाबींची बारमध्ये चौकशी केल्याचे आणि या चौकशीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार असल्याचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी सांगितले.दर तासानंतर पोलीस धडकणारलोकमतने हे सर्व प्रकाशित करताच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून त्याची गंभीर दखल घेतल्या गेली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांनी या बारमध्ये जाऊन पाहणी केली. त्यांनी बुटीबोरी एमआयडीसी पोलिसांना चांगलेच खडसावले. आजपासून या बारमध्ये दर तासानंतर पोलीस जातील आणि आतमध्ये काय सुरू आहे, त्याची पाहणी करतील, असेही निर्देश बुटीबोरी पोलिसांना देण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, या बारचा परवाना, इमारतीचा परवाना आणि अन्य संबंधित बाबींचीही आता चौकशी केली जाणार आहे.साथीदारांची धावपळलोकमतच्या वृत्ताने डान्स बार आणि तो चालविणाऱ्याचे ‘राज’ उजेडात आणले. त्यामुळे एकीकडे महसूल, उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागातील भ्रष्ट मंडळींची स्वत:चा सहभाग उघड होऊ नये म्हणून धावपळ सुरू झाली. दुसरीकडे ‘राज’चे साथीदार असलेल्यांनी कारवाई होऊ नये म्हणून धावपळ केली. प्रकरण वरिष्ठ पातळीवर चर्चेला गेल्याने यासंबंधाने काही दिवसात धक्कादायक कारवाईचे संकेत मिळाले आहेत.