लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्र सेवा दलाचे नेते पन्नालाल सुराणा यांच्या अनाथालयाचे अनुदान देण्यासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून तथ्य आढळल्यास त्याला बडतर्फ केले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. सुराणा ‘आपले घर’ हे अनाथालय चालवतात. ऑक्टोबर १९९३ च्या भूकंपात अनाथ झालेल्या मुलांसाठी त्यांनी हे अनाथालय सुरू केले. २००० मध्ये या संस्थेला शासकीय अनुदान सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. सध्या या संस्थेचे २५ लाख १२ हजार अनुदान प्रलंबित आहे. ते मिळावे यासाठी सुराणा पाठपुरावा करत होते. मात्र, महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्याने लाच मागितली. काळ बदलला आहे, तुम्हीही बदलले पाहिजे असेही सुराणा यांना सुनावले. मात्र, सुराणा यांनी लाच देण्यास नकार दिल्याने अनुदान थांबविण्यात आले आहे. या अधिकाऱ्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी पवार यांनी केली.
अनुदान तत्काळ देणार
स्वातंत्र्यसैनिकांकडून अशा पद्धतीने लाच मागितली जात असेल तर ते गंभीर आहे. लाच मागितली का याची चौकशी केली जाईल आणि अधिकारी दोषी आढळला तर बडतर्फ केले जाईल तसेच अनाथलायाचे अनुदान तत्काळ देण्याचे निर्देशही दिले जातील, असे फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले.
- या प्रकरणाबाबत ‘लोकमत’नेही वेळोवेळी आवाज उठवला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"