नागपूर : तीन लाख रुपयांना नवजात अर्भक विकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अनाथाश्रम संचालक सलामुल्ला खान हा कुमारी मातांकडून जन्माला आलेल्या बाळांना बेकायदेशीरपणे ठेवत असे. या नवजात बालकांना विकून तो लाखो रुपये कमवत असे. वर्षभरापूर्वी, कोंढाळी येथील खान याच्या अनाथाश्रमाची मान्यता, अशाच एका प्रकारात सहभागी झाल्यामुळे रद्द करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
गुन्हे शाखेच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने नवजात अर्भक तीन लाख रुपयांना विकल्याप्रकरणी खानला अटक केली आहे. याप्रकरणी नवजात शिशु विकत घेणारी शिक्षिका आणि दोन परिचारिकांनाही अटक करण्यात आली आहे. पती आणि मुलाच्या अमानुष छळामुळे त्रस्त बनलेल्या शिक्षिकेने अनाथ नवजात बालक दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. या शिक्षिकेने सुरुवातीला टेस्ट ट्यूब पद्धतीने मातृसुख मिळविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यश न मिळाल्याने तिने अनाथ मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. आरोपी परिचारिकांच्या माध्यमातून ती खानच्या संपर्कात आली. २०१९ मध्ये तिने खानकडून एक नवजात बालक विकत घेतले. त्यानंतर शिक्षिकेचा मुलगा आणि पती नाराज झाले. मुलाने तक्रार केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
खान हा एका शैक्षणिक संस्थेत लिपिक म्हणून काम करत होता. सरकारी नोकरी करत असताना १९९९ मध्ये त्याने कोंढाळी येथे अनाथाश्रम सुरू केला. २०१९ मध्ये एका अज्ञात कुमारी मातेने तिच्या मुलाला खानकडे सुपूर्द केले. खानने आरोपी परिचारिकांना याची माहिती दिली. परिचारिकांनी शिक्षिकेला खानला भेटायला लावले. खानने तीन लाख रुपये घेऊन ते नवजात शिक्षिकेच्या स्वाधीन केले. आता पोलिसांनी पकडल्यानंतर खान कुमारी मातेची माहिती घेण्यास नकार देत आहे. तो अनेक निपुत्रिक जोडप्यांना अनाथाश्रमातून अधिकृत मुले दत्तक दिल्याचा दावा करत आहे.
'तो' चौकशीला टाळतोय
वर्षभरापूर्वी खानने काही लोकांना बेकायदेशीरपणे मूल मिळवून देण्यात मदत केली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बालकल्याण समितीने खान अनाथाश्रमाची मान्यता रद्द केली. खानने एका वर्षात मूल विकल्याची दुसरी घटना समोर आली आहे. खान १८ मेपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत आहे. वय आणि प्रकृतीचे कारण सांगून तो पोलिसांच्या चौकशीला टाळत आहे.