आॅनलाईन लोकमतनागपूर : संविधान दिन आज देशभरात साजरा केला जातो. या दिवशी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले जाते. नागपुरातूनच उदयास आलेली ही लोकचळवळ आज संपूर्ण देशात पोहोचली आहे. यातच आता भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिलालेखही उभारले जात आहे. नागपूर महापालिकेने बेझनबाग य परिसरात १८ फूट उंच आकर्षक असा शिलालेख उभारला आहे. एखाद्या महापालिकेने संविधानाच्या प्रास्ताविकेचा शिलालेख उभारण्याचे कार्य देशात पहिल्यांदाच झाले आहे, हे विशेष.उत्तर नागपुरातील बेझनबाग बौद्ध विहार परिसरात हा १८ फूट उंच आकर्षक शिलालेख उभारण्यात आला आहे. मनपचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी सामाजिक जाणिवेतून संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शिलालेखाची संकल्पना मांडली. त्याला मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तत्कालीन महपौर अनिल सोले, प्रवीण दटके, संदीप जाधव आणि आताच्या महापौर नंदा जिचकार मनपा आयुक्त यांनी त्याला भरघोस मदत केली आणि हा शिलालेख उभा राहिला. आर्किटेक्ट उदय गजभिये यांनी आकर्षक असे डिझाईन केले आहे. शिलालेख उभारताना पांढऱ्या रंगाच्या मार्बल दगडावर कोरीव कर्विन वर्क करण्यात आले आहे. तसेच त्याचे सुशोभीकरणही झाले आहे. गेल्याच वर्षी शिलालेखाचे लोकार्पण करण्यात आले. आज हा शिलालेख परिसरातीलच नव्हे तर नागपुरातील एक आकर्षक व संविधानाप्रति सन्मानाचे स्थळ बनले आहे.