लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन दिवसांनी शाळा सुरू होत असताना, विद्यार्थ्यांचा प्रवास कसा, ऑनलाइन शिक्षण किती झाले, याचे अहवाल ऐनवेळी मागण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांची पळापळ सुरू झाली आहे. कुठलेही पूर्व नियोजन नसताना प्रशासन शाळा सुरू करण्याचा अट्टहास करीत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बसने प्रवास करून शाळेत येतात. सोमवारी सायंकाळी ग्रामीण भागातील अशा विद्यार्थ्यांची माहिती शाळेकडून प्रशासनाने मागितली. विशेष म्हणजे सत्र सुरू झाल्यानंतर एकही दिवस विद्यार्थ्यांची शाळा भरली नाही. त्यामुळे किती विद्यार्थी यंदा बस किंवा इतर वाहनाने शाळेत येणार याची कल्पना शिक्षकांना नाही, तरीही शिक्षकांनी धावपळ करून प्रशासनाला माहिती पुरविली. त्यातच दुसरी माहिती मागविण्यात आली की, ऑनलाईनद्वारा किती विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला याची टक्केवारी आणि किती विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची सुविधा नाही. गेल्या दोन दिवसांपासून अशा वेगवेगळ्या माहितींचे संकलन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यात मुख्याध्यापक, शिक्षक चांगलेच भरडले जात आहेत.
कसे येणार विद्यार्थी शाळेत...
सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. दुर्गम भाग व छोट्या गावातील बसेस बंद आहेत. बहुतांश ग्रामीण भागातील शाळेत १० ते १५ किलोमीटरचा प्रवास करून शाळेत येतात. पालकांना शेतीचा हंगाम असल्यामुळे ने-आण करणे कठीण आहे. त्यामुळे बस सुरू करण्याची मागणी गावकरी करीत आहेत. बस सुरू झाल्यास संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना चाचणी करून शिक्षकांनी संकलित केले संमतिपत्र
१९ ते २२ नोव्हेंबर दरम्यान शिक्षकाना कोरोनाची चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. लगेच पालकांचे संमतिपत्र गोळा करण्यासही सांगितले होते. अशात शिक्षकांनी कोरोनाच्या चाचण्या करून, पालकांच्या दारोदारी जाऊन संमतिपत्र गोळा केले. विशेष म्हणजे यातील काही शिक्षक पॉझिटिव्हदेखील आले.