नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नियमांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. गुरुवारी १०६ मंगल कार्यालय, लॉन, खाणावळी व प्रतिष्ठानांची तपासणी करून १८ जणांना २ लाख १ हजारांचा दंड मनपाने ठोठावला. मनपाच्या दहाही झोनमधील १०६ मंगल कार्यालयांची आज तपासणी करण्यात आली. यामध्ये लक्ष्मीनगर झोनमधील १०, धरमपेठमधील ९, हनुमाननगर १३, धंतोली ६, नेहरूनगर ११, गांधीबाग १२, सतरंजीपुरा १०, लकडगंज ८, आशीनगर १२ आणि मंगळवारी झोनमधील ४ मंगल कार्यालयांची तपासणी मनपाच्या उपद्रव शोध पथकाने केली. यात मंगल कार्यालयासह खाणावळ, हॉटेलसह अन्य प्रतिष्ठानांचीही तपासणी करण्यात आली. सोशल डिस्टन्स न पाळल्याने व नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. यात धरमपेठ झोनमध्ये रवीनगर येथील अग्रसेन भवनला १० हजारांचा दंड केला. लेडिज क्लबला ५ हजार, प्रीतम काळे खाणावळ ५ हजार, हनुमाननगर झोनमधील सावरकर लॉन १५ हजार, साहू रेस्टारंट २ हजार, विद्यावासिनी हॉटेल २ हजार, धंतोली झोनमधील नंदी वाइन शॉप ५ हजार, नेहरूनगर झोनमधील गुरुदेव संस्कार भवन ५ हजार, आशीनगर झोनमधील प्रल्हाद लॉन १५ हजार, शेर-ए-पंजाब लॉन १५ हजार, अदालत लॉन २५ हजार, व्हाइट हॉल लॉन १५ हजार, मंगळवारी झोनमधील जे.बी. सेलिब्रेशन हॉल २५ हजार, किंग्ज किचन ५ हजार, अबात कम्युनिटी हॉल ३५ हजार, अमराई लॉन १० हजार व शिव किराणा शॉपवर २ हजारांचा दंड करण्यात आला.
१०६ मंगल कार्यालयांची तपासणी; दोन लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:09 AM