नागपूर : विधिमंडळाची अंदाज समिती विदर्भातील सिंचन प्रकल्पांची ८ व ९ सप्टेंबर रोजी पाहणी करणार आहे. या पाहणीत सिंचन घोटाळ्याशी संबंधित बरेच तत्थ्य समोर येण्याची शक्यता आहे. यामुळे घोटाळ्यात सहभागी असलेल्या कंत्राटदार व सिंचन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. समिती हिवाळी अधिवेशनात आपला अहवाल सादर करणार असून या वेळी अनेकांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आ. अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये सर्वपक्षीय एकूण २९ सदस्य आहेत. समितीने महाराष्ट्राच्या काही भागात दौरे केले आहेत. विदर्भातून प्रा. अनिल सोले, डॉ. मिलिंद माने व चरण वाघमारे या आमदारांचा समितीत समावेश आहे. विदर्भातील या आमदारांच्या विनंतीवरूनच समिती सर्वाधिक सिंचन घोटाळे गाजत असलेल्या प्रकल्पांच्या पाहणीसाठी विदर्भात येत आहे. अंदाज समितीच्या या दौऱ्यात सिंचन विभागातील एकाही अधिकाऱ्याला सहभागी करून घेतलेले नाही. समितीच्या एकूणच व्यवस्थेसाठी सिंचन विभागाची मदतही घेण्यात आलेली नाही. समिती स्वतंत्रपणे दौरा करून सिंचन प्रकल्पांची पाहणी करणार आहे. समिती ८ सप्टेंबर रोजी सतरापूर उपसा सिंचन योजना ( कामठी), पेंच कालवा, भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्प, गोसीखुर्द प्रकल्पाचा डावा कालवा व उजवा कालवा, व अंभोरा-टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाची पाहणी करून नागपुरात परत येईल. ९ सप्टेंबर रोजी काटोल तालुक्यातील कारनदी प्रकल्प, पिंपळगाव वखाजी, वर्धा जिल्ह्यातील तुरागोंदी प्रकल्प व यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाची पाहणी करणार आहे. विदर्भातील बहुतांश सिंचन प्रकल्पांची कामे अर्धवट राहिली आहेत. निधी खर्च झाला पण प्रत्यक्षात तेवढे काम झालेच नाही. काही प्रकल्पांना विलंब करून खर्च वाढविण्यात आला. असे सर्व प्रकार ही समिती शोधून काढणार आहे. समिती सिंचन प्रकल्पांना भेटी देऊन संबंधित प्रकल्पांवर आजवर झालेला खर्च, प्रत्यक्षात झालेले काम, कामाची गुणवत्ता आदींची तपासणी करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही सामाजिक संस्थांतर्फे अंदाज समितीला सिंचन घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे सोपविली जाणार आहेत. समिती दौऱ्यात अशा स्वरुपाच्या तक्रारी व निवेदनेही स्वीकारण्याची शक्यता आहे. ही संसदीय समिती असल्यामुळे समितीचे सदस्य दौऱ्याविषयी किंवा त्यांना आढळून आलेल्या तत्थ्याविषयी वाच्यता करणार नाही. मात्र, आढळून आलेल्या तत्थ्यांचा सर्वंकष अहवाल तयार करून तो विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात सिंचन घोटाळ्ेबाजांची पुन्हा एकदा पोलखोल होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
अंदाज समिती करणार सिंचन प्रकल्पांची पाहणी
By admin | Published: August 27, 2015 2:47 AM