नागपूर : गोरेवाडा येथील आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्रकल्पाच्या निरीक्षणासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण (नवी दिल्ली) येथील चमू शुक्रवारी रात्री नागपुरात दाखल झाली आहे. १८ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता ही चमू गोरेवाड्याची पाहणी करून सुधारित आराखड्यानुसार माहिती घेईल. या चमूत ओडिशाचे माजी मुख्य वनसंरक्षक एस.के. पटनायक आणि प्रोफेसर रुमेल मेहता यांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजता ही चमू नागपुरात दाखल झाली. त्यानंतर संबंधित वन अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा केली. शनिवारी दौऱ्यात या चमूसोबत एफडीसीएमचे अधिकारी आर. यादव, सतीश वडस्कर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित राहतील. या पाहणीनंतर आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या सुधारित आराखड्यास अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या प्रकल्पांतर्गत २७ कोटी रुपये खर्चून नवनिर्मित रेस्क्यू सेंटरचे कामच अंतिम टप्प्यात पोहचू शकले आहे. ३१ मार्च रोजी राज्य शासनाने ५.६५ कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता. यानंतर प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे निरीक्षण
By admin | Published: April 18, 2015 2:33 AM