लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीचे महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ महाराज बाग प्राणिसंग्रहालय व गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या रेस्क्यू सेंटरचे गुरुवारी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, (सीझेडए) नवी दिल्लीचे पदाधिकारी डॉ. बी. के. गुप्ता यांनी निरीक्षण केले. मात्र, महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या मंजुरीला घेऊन डॉ. गुप्ता काय बोलले, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलण्याचे टाळल्याने प्रश्नचिन्ह कायम आहे.डॉ. गुप्ता यांनी गुरुवारी सकाळी १०.३० वाजता महाराज बाग प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्राण्यांना ठेवण्यात येणाऱ्या पिंजऱ्यांचे निरीक्षण केले. त्यानंतर ते प्राणिसंग्रहालयाचे नियंत्रक व कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता के.डी. ठाकूर, सचिव राजेश चव्हाण आणि प्राभारी डॉ. सुनील बावस्कर यांच्याशी भेटून चर्चा केली. सुत्रानूसार, डॉ. गुप्ता यांनी मागे केलेल्या महाराज बाग प्राणिसंग्रहालयाच्या निरीक्षणात जी विकास कामे सांगितली होती ती त्यांना दिसून आली नाहीत. यावर डॉ. गुप्ता यांची काय प्रतिक्रिया होती यावर महाराजबाग प्रशासनाने बोलणे टाळले. विशेष म्हणजे, ३१ डिसेंबर २०१६ मध्ये महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची परवानगी संपायला आली असताना डॉ. गुप्ता यांनी महाराज बागेची पाहणी केली होती. ‘सीझेडए’ गेल्या दहा वर्षांपासून वन्य प्राण्यांची सुरक्षा आणि नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देण्यावर सूचना देत आला आहे. गोरेवाडा संरक्षण केंद्राचीही पाहणीडॉ. गुप्ता यांनी दुपारी २.३० वाजताच्यासुमारास गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या रेस्क्यू सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच येथील संरक्षण केंद्राची पाहणी केली. सोबतच वन्यप्राणी, पर्यटकांशी संबंधित सोयी, प्रशासकीय कामकाजाचेही अवलोकन केले. त्यानंतर त्यांनी रेस्क्यूचे व्हेटरनरी डॉ. विहंग धूत, डॉ. भोजने आणि गोरेवाडाचे विभागीय व्यवस्थापक काळे यांच्याशी चर्चा केली. पिंजऱ्यांना घेऊन नाराजीमहाराज बाग प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांचे लोखंडी पिंजरे फार जुने झाले आहेत. महाराज बाग प्रशासनाकडे पिंजरे आणि संरक्षण भिंतीला घेऊन पर्याप्त जागा आहे. मात्र त्यांचे झालेले दुर्लक्ष यावर डॉ. गुप्ता यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.