लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात पोलिसांचा जागोजागी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांसोबतच प्रादेशिक परिवहन विभागातील यंत्रणादेखील सक्रिय झाली आहे. पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदीच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे इतर राज्यातून नागपुरात येणाऱ्या खासगीसह एसटी महामंडळाच्या बसेससह इतरही वाहनांची तपासणी आरटीओकडून करण्यात येणार आहे. तसे आदेशच परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सर्व आरटीओ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
विधानसभा निवडणूक शांततेत व प्रलोभनमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी परिवहन आयुक्त भिमनवार यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांची बैठक घेतली. निवडणुकीच्या या दिवसात कोणत्याही अधिकाऱ्याने आपले कार्यक्षेत्र सोडू नये, अशा सूचना त्यांनी दिल्या. आरटीओ कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रत्येक सीमा तपासणी नाक्यावर नागपुरात येणाऱ्या प्रत्येक शासकीयसह खासगी वाहनाची कसून तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. विशेषतः बसेसची तपासणी करण्यावर त्यांनी भर दिला. दर दिवसाचा तपासणीचा अहवाल परिवहन आयुक्त कार्यालयात पाठविण्याचे निर्देशही दिले. प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार असल्याने मोटर वाहन निरीक्षकांच्या मदतीला सहायक मोटर वाहन निरीक्षकही देण्यात आले आहेत. तपासणी पथकात पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकही राहणार आहे.
रोज १७० वर बसेसची नागपुरात 'एन्ट्री'नागपूर आरटीओ कार्यालयांतर्गत देवरी, खवासा, कांद्री व केळझर असे चार सीमा तपासणी नाके येतात. या चारही सीमा तपासणी नाक्यांतून दररोज जवळपास १७० खासगी व एसटी महामंडळाच्या बसेस नागपुरात 'एन्ट्री' करतात, मतदारांना प्रलोभन देण्यासाठी या बसमधून रोख रक्कम, दारू, कपडे किंवा फूड पॅकेट येण्याची शक्यता पाहता, प्रत्येक बसची तपासणी केली जाणार आहे.
देवरी नाक्यावरून दारूच्या १,३५० बाटल्या जप्त प्राप्त माहितीनुसार, देवरी सीमा तपासणी नाक्यावरून एका खासगी बसमधून बुधवारी १.३५० दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.आरटीओ पथकाने दारूचा हा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडे जमा केला. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे
स्ट्राँगरूममध्ये ठेवलेल्या ईव्हीएम मशीन्सच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्यविधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या काही दिवसांवर आले असताना शहरातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. विशेषतः स्ट्रॉंगरूममध्ये ठेवलेल्या ईव्हीएम मशीन्सच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. शुक्रवारी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी स्ट्राँगरूमची पाहणी करत बंदोबस्ताचा आढावा घेतला. मागील काही दिवसांपासून नागपूर पोलिसांनी शहरात तपासणी मोहीम वाढविली आहे. विविध ठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुरू आहे. सोबतच गुन्हेगारांचीदेखील झाडाझडती घेण्यात येत आहे. मतदानासाठी आलेल्या ईव्हीएम स्ट्रॉगरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. सिव्हिल लाइन्स येथील सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूलमधील स्ट्राँगरूमची पोलिस आयुक्तांनी पाहणी केली. त्यांनी त्यावेळी सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. तसेच मतदान अधिकाऱ्यांशीदेखील संवाद साधला. कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सेंट उर्सुलामध्येच बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदानाची संधी दिली जात आहे. पोलिस आयुक्तांनी त्याचादेखील आढावा घेतला.