नागपूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी आज नागपूर दाैरा करून येथील मुख्य तसेच अजनी रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या पुनर्विकास कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाचा आढावाही घेतला.
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूंना पुनर्विकासाचे काम सुरू आहे. हे काम कुठवर आले, झालेल्या कामाचा दर्जा कसा आहे, त्याची महाव्यवस्थापकांनी पाहणी केली. गुणवत्तापूर्ण काम करण्यासोबतच दिलेल्या मर्यादेत काम पूर्ण करण्यासंबंधी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
हे काम पूर्णत्वास गेल्यानंतर नागपूरची रेल्वेची कनेक्टिव्हिटी अधिक प्रशस्त होईल आणि प्रवाशांना या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जांच्या सुविधा मिळतील, असा आशावाद त्यांनी यावेळी बोलून दाखविला.