नागपूर : पावसाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित होण्याची शक्यता आहे. यातून गावात साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. याचा विचार करता जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी मोहीम ३० जूनपर्यंत राबविली जात आहे. तसेच जलसुरक्षकांमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील पाणी नमुने गोळा करून ते तपाणीसाठी माहितीसह प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
या तपासणीअंतर्गत नळयोजनेचे २२१८ स्त्रोत, २२११ शाळा व २१५२ अंगणवाड्यांमधील नमुने तसेच नळ पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेतील घरघुती स्तरावरील पहिल्या व शेवटच्या अश्या दोन ठिकाणी पाणी नमुने घेवून रासायनिक फिल्ड टेस्ट किट व्दारे व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत दक्षता घेण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याची सुरक्षीतता अबाधित राखण्यासाठी पाणी तपासणी मोहीम राबविली जात आहे.
पिण्याच्या पाण्याचे योग्य पध्दतीने शुद्धीकरण करणे अत्यंत आवश्यक असते. यासाठीच जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्त्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी केली जात आहे. पाणी गुणवत्तेच्या WQMlSया पोर्टलवर पाणी पुरवठा योजनांचे स्त्रोत, शाळा, अंगणवाडी व वैयक्तिक नळ जोडणी असलेली कुटूंबे इ. स्त्रोतांचे पाणी नमुने रासायनिक तपासणीसाठी गोळा करुन पाणी गुणवत्ता पोर्टलवर युआयडी काढूनच संबंधित उपविभागीय प्रयोगशाळेत जमा करण्यात येणार आहे. पाणी नमुने प्रयोगशाळेत पाठवताना कॕनवर पाणी नमुन्याचा पाणी गुणवत्ता पोर्टलवरील नोंदीचा संकेतांक असणे गरजेचा आहे.
ग्रामपंचायतींनी अशी घ्यावी काळजी
पावसाळ्यात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित होऊन साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये , यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी नियमित शुद्धीकरण प्रक्रिया करुन पिण्यासाठी पाणीपुरवठा करावा. जलस्त्रोतांजवळचा व जलवाहिन्यांचा परिसर स्वच्छ ठेवावा, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांजवळ सांडपाण्याचा निचरा होऊ नये, याची काळजी घ्यावी. पाणी शुद्धीकरणासाठी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रावर ३३ टक्के क्लोरीन असलेल्या ब्लिचिंग पावडरचा साठा तीन महिने पुरेल एवढा उपलब्ध ठेवावा, घरघुती पाणी शुध्दीकरणाच्या पध्दती बाबत ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती तसेच ग्रामपंचायत कार्यकारणीने नागरीकांना माहिती द्यावी. असे आवाहन जि.प.च्या पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक संजय वानखेडे यांनी केले आहे.