नागपूर : राजस्थानातील रणथंबोर येथे उभारल्या जाणाऱ्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी तेथील वन अधिकाऱ्यांच्या एका पथकाने रविवारी नागपुरातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरची पाहणी केली. नागपुरातील हे सेंटर देशात एकमेव आहे, हे विशेष !
राजस्थानच्या मुख्य वन्यजीव रक्षकांनी रविवारी रणथंबोर व्याघ्र प्रकल्प, केवलादेव राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांना नागपूरला पाठवले होते. येथील सेंटरची संकल्पना, कार्यपद्धती जाणून घेणे, तसेच उपलब्ध साधनसामग्री पाहून त्यावर चर्चा करणे, हा या भेटीमागील उद्देश होता.
या भेटीदरम्यान, ट्रान्झिटचे आतापर्यंतचे कार्य व उपचारासाठी लागणारे, वन्यजिवांना पकडण्यासाठी लागणारे पिंजरे व वाहतुकीची साधने, ॲम्ब्युलन्स, रेस्क्यू व्हॅन हे पाहून चमू अवाक् झाला. यासंदर्भात माहिती व प्रात्यक्षिक देण्याचे काम वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हाते व डॉ. सय्यद बिलाल अली यांनी केले.
यावेळी ट्रान्झिटचे वनपरिक्षेत्र अधिकारी गंगाधर जाधव, वनपाल अनिरुद्ध खडसे, वनरक्षक मिलिंद वनकर, पशुपर्यवेक्षक सिद्धांत मोरे, स्वयंसेवक सौरभ सुखदेवे हजर होते.