लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माणसाचे आयुष्य मेणबत्तीप्रमाणे असते. पडले असले की नाश पावते आणि जळत असले की इतरांना प्रकाश देत राहते. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्यही असेच. काहींना ते ‘आता सर्व संपले’ असे वाटते, पण काहींना ते राहिलेल्या आकांक्षा पूर्ण करण्याची संधी वाटते. स्वावलंबीनगरच्या काही महिलांनाही समाजऋण म्हणून दिन, दुखितांच्या सेवेची इच्छा पूर्ण करण्याची संधी सेवानिवृत्तीनंतर मिळाली. त्यांनीही या एक नवीन सुरुवात म्हणून या संधीचे सोने करीत एकत्रितपणे ‘पूर्णब्रह्म सेवा समिती’च्या माध्यमातून सेवेचं व्रत स्वीकारले आणि फुलविले.आयुष्यभर घरासाठी, मुलांसाठी दगदग करताना समाजातील गरजवंतांसाठी काही तरी करण्याची मनोमन इच्छा. परंतु नोकरी आणि घर अशी दुहेरी जबाबदारी सांभाळताना ही इच्छा अपूर्ण राहिली होती. सेवानिवृत्तीनंतर मात्र या मनातल्या इच्छा पूर्ण करण्याची वेळ चालून आली. समाजातील अनाथ, अंध, अपंग, मूकबधिर मुले, वृद्ध व निराधार लोकांसाठी जे शक्य होईल ते करण्यासाठी १० ते १२ महिलांनी एकत्र येऊन ‘पूर्णब्रह्म’ हा उपक्रम सुरू केला. समितीच्या मीना मोहन अमरावतीकर यांनी सांगितले, महिलांनी स्वत:च्या बचतीमधील काही पैसे गोळा करून २०१७ च्या महिला दिनी हा उपक्रम सुरू केला. सुरुवात म्हणून पहिलीच भेट अदासा येथील वृद्धाश्रमाला दिली. त्यावेळी शक्य झाली ती मदत या वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना दिली. पुढे तीन महिन्यानंतर देवलापारजवळच्या निमडोह येथील आश्रमशाळेला भेट दिली. या शाळेत ६०० च्यावर अनाथ व निराधार मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांना गोडधोड जेवण, शालेय साहित्य व संस्थेला पुस्तकांचा संच भेट दिला.समितीच्या कार्याने प्रेरित होऊन पुढे समाजसेवेची इच्छा असलेल्या अनेक महिलांनी यात सहभाग घेतला आणि पूर्णब्रह्मची संख्या ५० वर गेल्याचे मीना मोहन यांनी सांगितले. आता या उपक्रमाशी निवृत्तच नाही तर गृहिणी आणि नोकरी करणाऱ्या महिलाही जुळल्या आहेत. प्रत्येक महिलेकडून दर महिन्याला ५० रुपये जमा करायचे आणि तीन महिन्यानंतर एका अभावग्रस्त संस्थेला भेट देण्याची योजना बनवायची. पुन्हा शक्य होईल तेवढी राशी गोळा करून संस्थेच्या आवश्यकतेनुसार त्यांना मदत करायची, हा पूर्णब्रह्मचा नित्यक्रम. बाबा आमटे यांच्या आनंदवनमधील भेट अशीच अविस्मरणीय ठरल्याचे त्यांनी सांगितले.समाजाने नाकारलेल्या कुष्ठरुग्णांचे जगणे पाहून मन भारावले आणि त्यांच्या सेवेत वाहिलेल्या आनंदवनचे कार्य पाहून प्रेरणाही मिळाली. समितीच्या संपूर्ण टीमने येथील ज्येष्ठांसोबत रवाबेसनाच्या लाडूच्या गोडधोड भोजनासह वेळ घालविला. सोबतच येथील अंध, अपंग व गरजू मुलांना शालेय साहित्य भेट दिले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आमच्या हृदयाच्या कोपऱ्यात सामावल्याची भावना मीना मोहन यांनी व्यक्त केली. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या, अभावग्रस्त आणि उपेक्षित घटकांची मदत करण्यात खरी ईश्वरसेवा असून, तोच खरा धर्म होय आणि शक्य होईल त्याप्रमाणे ही सेवा करीत राहू, ही भावनाही त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.