लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वय वर्षे ६७. व्यवसायाने शेतकरी. शिक्षण ११ वी नापास. परंतु समाजासाठी काही तरी करण्याची जिद्द. याच जिद्दीतून अवयवदान जनजागृतीला घेऊन प्रमोद महाजन शंभर दिवसांच्या दहा हजार किलोमीटरच्या प्रवासाला बाईकने निघाले आहेत. सैन्यातील एका जवानाला मूत्रपिंड दान (किडनी) करून त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. ‘भारत आॅर्गन यात्रा’च्या निमित्ताने ते मंगळवारी नागपुरात पोहचले. येथे मेडिकलचे बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र तिरपुडे यांनी त्यांचे स्वागत केले.जिल्हा सांगली, ता. वाळवा येथील गवळी गावचे प्रमोद महाजन यांनी आपल्या ‘भारत आॅर्गन यात्रे’ला शनिवारवाडा पुणे येथून २१ आॅक्टोबर २०१८ पासून सुरुवात केली. तेथून मुंबई, राजस्थान, गुजरात, हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड होत महाराष्ट्रात प्रवेश करून नागपुरात पोहचले. आपण समाजाला काही देणे लागतो, हाच उद्देश ठेवून महाजन यांनी २००९ मध्ये ‘एड्स’ जनजागृतीसाठी साडेसात हजार किलोमीटर बाईकने प्रवास केला. त्यांनी त्यांच्या नातीच्या जन्माचे स्वागत म्हणून निराधार महिलांना स्वखर्चाने साड्यांचे वाटप केले. ‘रिबर्थ फाऊंडेशन’ने महाजन यांची दुचाकी मोहीम आयोजिली आहे. मोहन फाऊंडेशन, झेडटीसीसी, बीव्हीजी, जीवनसार्थकी, रोटोसोटो, डोनेटलाईफ, मायलेज मंचर्स या स्वयंसेवी संस्थांनीदेखील या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे.‘लोकमत’शी बोलताना महाजन म्हणाले, अवयवदान एक आशेचा किरण आहे. एक ‘मेंदूमृत’ अवयवदाता १० जणांना जीवनदान देतो, तर ३५ लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करतो. एका मृतदेहामुळे सुमारे ४२ लोकांना आपले आयुष्य पूर्ववत जगण्यास मदत होते. परंतु आजही हव्या त्या प्रमाणात अवयवदान होत नाही. हजारो रुग्ण आज नाही तर उद्या अवयव मिळेल, या आशेने मृत्यूशी झुंज देत आहेत. एका अभ्यासानुसार अवयवाच्या विकाराने किंवा निकामी झाल्याने भारतात दरवर्षी सुमारे पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो. हे थांबावे एवढीच इच्छा या मोहिमेच्यानिमित्ताने आहे.