लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: धावणे आणि हृदय याचा जवळचा संबंध आहे. धावल्यामुळे हृदय तंदुरुस्त राहील आणि हृदय तंदुरुस्त असेल तर धावपळीच्या जीवनात प्रत्येक काम उत्साहाने करणे शक्य होईल. लोकमततर्फे ११ फेबु्रवारी रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनच्या निमित्ताने सर्वांना धावण्याची संधी उपलब्ध झाली आहे. स्वत:ला फिट ठेवायचे आहे, हृदय मजबूत करायचे असेल तर धावावे लागेल. प्रसिद्ध हृदय तज्ज्ञ डॉ. सतीश पोशट्टीवार यांच्या मते तंदुरुस्त राहण्यासाठी धावणे आवश्यक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर लोकमत महामॅरेथॉनचे आयोजन एक प्रशंसनीय पाऊल आहे. लोकमत महामॅरेथॉनच्या आयोजनाला त्यांनी प्रेरणास्रोत संबोधले आहे. डॉ. पोशट्टीवार म्हणाले, हे आयोजन संस्मरणीय ठरेल आणि सामान्य नागरिकांमध्ये स्वास्थ्याप्रति जागृती निर्माण होईल. व्यवसायाने हृदयरोग तज्ज्ञ असलेल्या डॉ. सतीश पोशट्टीवार यांच्यासोबत झालेली विशेष बातचित.
लोकमत महामॅरेथॉनबाबत आपण काय सांगाल, या आयोजनाबाबत तुमची प्रतिक्रिया ?डॉ.पोशट्टीवार - लोकमतचा हा उपक्रम प्रशंसनीय आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही, पण चालणे किंवा धावणे एक चांगला व्यायाम आहे. महामॅरेथॉनमुळे जनसामान्यांना धावण्याची प्रेरणा मिळेल.
धावण्याचे काय लाभ आहेत ?डॉ. पोशट्टीवार - अनेक रोगांवर धावणे हा उपचार आहे. धावणे या व्यायाम प्रकारामुळे हृदयासंबंधित अनेक आजारांना दूर ठेवता येते. या क्रीडाप्रकारामुळे रक्तदाब व शुगर यावर नियंत्रण राखता येते. त्यामुळे धावणे आवश्यक आहे. महामॅरेथॉनसारखे आयोजन लोकमतचा स्तुत्य उपक्रम आहे.
हृदय व धावणे याचा काय संबंध आहे ?डॉ.पोशट्टीवार : तंदुरुस्त व्यक्ती वेगाने पळू शकते, पण त्याला आपली शारीरिक क्षमता लक्षात घेणे आवश्यक आहे. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होताना धावण्याबाबत बरेच काही शिकता येईल.
हृदयरोगग्रस्त व्यक्ती मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ शकते का ?डॉ. पोशट्टीवार : सहभागी होऊ शकते, पण त्यापूर्वी त्या व्यक्तीने आपल्या हृदयरोग तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. तज्ज्ञाला जर वाटत असेल की हृदयरोगग्रस्त व्यक्ती मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यास फिट आहे, तर मग कुठला प्रश्नच उपस्थित होत नाही, पण तज्ज्ञाने जर नकार दिला तर त्या व्यक्तीने मात्र यापासून दूर राहायला हवे.