दयानंद पाईकराव
नागपूर : दोन मुली झाल्यामुळे पतीने घराबाहेर काढले. १३ दिवसांची मुलगी असताना गौरी प्रपंचे यांच्यावर आभाळ कोसळले. परंतु न डगमगता त्यांनी जगण्याचा आधार शोधला. सायकलवर दूध वाटणे सुरू केले अन् गेल्या ४६ वर्षांपासून त्या सायकलवर दूध वाटून, धुणीभांडी करून कोणापुढे हात न पसरता आपला संसार चालवित आहेत.
गौरी मारोतराव प्रपंचे (६६, गोपाळनगर पहिला बसस्टॉप) असे या कणखर महिलेचे नाव आहे. गौरी यांना दोन मुली झाल्यामुळे त्यांच्या पतीने त्यांना घराबाहेर काढले. दोन मुलींना घेऊन काय करावे, कुठे राहावे, मुलींचे पालनपोषण कसे करावे, असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले. परंतु धीर न सोडता त्यांनी जगण्यासाठी धडपड केली. १९७८ मध्ये ४५ पैशांना दुधाची बाटली असताना सायकल घेऊन त्यांनी घरोघरी दूध वाटणे सुरू करून मुलींचे पालनपोषण केले. पुढे पाच वर्षांनी पुन्हा त्यांचा पती आला आणि ते एकत्र राहू लागले. त्यानंतर त्यांना पुन्हा एक मुलगा आणि मुलगी झाली. परंतु पतीला दारूचे व्यसन असल्यामुळे गौरी यांच्यावरच घराची जबाबदारी होती. २००४ मध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. गौरी यांनीच तीनही मुलींचे लग्न लावून दिले.
मुलाचेही लग्न केले. परंतु मुलगाही खास काही करीत नसल्यामुळे गौरी यांच्या नशिबात कामापासून निवृत्ती म्हणतात ती आलीच नाही. आज त्या ६६ वर्षांच्या झाल्या असल्या तरीसुद्धा गोपालनगर, अभ्यंकरनगर, माधवनगर, बजाजनगर परिसरात दूध वाटतात. त्यांचा मुलगा कामाच्या शोधात मुंबईला गेला आहे. सध्या गौरी या सून आणि नातीसह राहतात. नातही कॉन्व्हेंटमध्ये पहिल्या वर्गात शिकत असल्यामुळे तिच्या शिक्षणाची जबाबदारी गौरी यांच्यावरच असल्यामुळे आजही त्या जीवापाड मेहनत करून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. आजपर्यंत त्यांच्या वाटाला आलेले दु:ख, त्यांनी केलेले कष्ट आणि आजही सुरू असलेली त्यांची धडपड खरोखरच वाखाणण्यासारखी तर आहेच पण इतरांनीही प्रेरणा घ्यावी, अशीच आहे.
धडपड खरोखरच वाखाणण्यासारखी
- आज त्या ६६ वर्षांच्या झाल्या असल्या तरीसुद्धा गोपालनगर, अभ्यंकरनगर, माधवनगर, बजाजनगर परिसरात दूध वाटतात. त्यांचा मुलगा कामाच्या शोधात मुंबईला गेला आहे. सध्या गौरी या सून आणि नातीसह राहतात.
- नातही कॉन्व्हेंटमध्ये पहिल्या वर्गात शिकत असल्यामुळे तिच्या शिक्षणाची जबाबदारी गौरी यांच्यावरच असल्यामुळे आजही त्या जीवापाड मेहनत करून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत.
- आजपर्यंत त्यांच्या वाटाला आलेले दुःख त्यांनी केलेले कष्ट आणि ३ आजही सुरू असलेली त्यांची धडपड खरोखरच वाखाणण्यासारखी तर आहेच पण इतरांनीही प्रेरणा घ्यावी, अशीच आहे.