नागपूर - गोरेवाडा वन्यजीव व संशोधन केंद्रामध्ये साहेबराव नावाच्या वाघाला कृत्रिम पंजा बसविण्याचा जगातील पहिला प्रयोग करण्यात आला. मात्र मांजर वर्ग प्रकारातील प्राण्यांमध्ये स्नायू आकुंचन करण्याची प्रवृत्ती असते. पंजा बसविल्यावर शुद्धीवर येताना वाघाने नेमके हेच केले. पाय आदळून पंजा वेगळा केला. त्यामुळे यशस्वीतेच्या काठावर पोहचलेल्या या प्रयोगाला शेवटच्या क्षणी मात्र अपयश आले.मागील दीड वर्षापासून गोरेवाडातील वन्यजीव व संशोधन केंद्रामध्ये हा प्रयोग अत्यंत गोपनीयपणे सुरू होता. या प्रयोगाच्या अखेरच्या टप्पात शनिवारी सकाळी या वाघाला भूल देऊन तयार के लेला पंजा बसविण्यात आला. त्यानंतर शुद्धीवर आलेल्या वाघाने या प्रयोगाला प्रतिसाद दिला नाही. आपल्या पायावर काहीतरी वेगळे लावल्याचे लक्षात आल्यावर त्याने दोन-तीन वेळा पाय आदळून कृत्रिम पंंजा वेगळा केला.या प्रयोगाबद्दल माहिती देण्यासाठी वनभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा जगातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा डॉ. सुश्रृत बाभुळकर यांनी केला. यावेळी युके येथील युनिव्हर्सिटी आॅफ लिड्सचे डॉ. पिटर यांच्यासह एझडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक रामबाबू, एसीएफ सूर्यंवंशी, गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक काळे, डॉ. आशिष पातुरकर, डॉ. शिरीष उपाध्ये, डॉ. गौतम भोजने उपस्थित होते.प्रयोगाबद्दल माहिती देताना डॉ. बाभुळकर म्हणाले, साहेबराव नावाच्या या वाघाच्या डाव्या पायाला गँगरीनमुळे खोलवर जखम झाली होती. त्यामुळे त्याला प्रचंड वेदना होत होत्या. चालणेही अवघड झाले होते. त्यामुळे त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करून नंतरच्या टप्प्यात मानवी कृ त्रिम अवयवासारखा पायाचा पंजा बसविण्याचे ठरले. त्यानुसार जून-२०१८ पासून तीन टप्प्यात हा प्रयोग सुरू करण्यात आला.असे होते तीन टप्पेपहिल्या टप्प्यात युरोप, थायलंड, न्यूयॉर्क आदींसह देशविदेशातील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून चर्चा करण्यात आली. नंतर दुसऱ्या टप्प्यात एप्रिल २०१९ मध्ये गँगरीन झालेल्या त्याच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर साहेबरावच्या वेदना थांबल्या. मात्र पाय लहान झाल्याने त्याला तीन पायावर चालावे लागायचे. नंतरच्या तिसºया टप्प्यात त्याच्या पायाचे मोजमाप घेऊन कृत्रिम पाय व पंजा तयार करण्यात आला. तो शनिवारी त्याच्या पायावर बसविण्यात आला. मात्र शुद्धीवर आल्यावर त्याने पाय झिडकारून व स्नायु आकुंचित करून बसविलेला पंजा काढला.
वाघाला कृत्रिम पाय बसविण्याचा प्रयोग अयशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 5:05 AM