नागपूर : मेट्रो रूळावरून धावताना होणारा आवाज आणि कंपन कमी करण्यासाठी रूळावर साऊंड बॅरिअर लावण्याची मागणी विदर्भ टॅक्स असोसिएशनने (व्हीटीए) महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्याकडे केली आहे.
रेल्वे मंत्रालयांतर्गत कार्यरत ट्रॅक डिझाईन डायरेक्टरेट रिसर्च डिझाईन्स व स्टॅण्डर्ड आर्गनायझेशने सप्टेंबर २०१५ मध्ये मेट्रो रेल्वे ट्रान्झिट सिस्टिमकरिता आवाज व कंपन संदर्भात दिशानिर्देश तयार केले आहेत. रहिवासी परिसराजवळून धावणाºया मेट्रो रेल्वेच्या रूळावर साऊंड बॅरिअर लावण्याचा उल्लेख केला आहे. मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला शहराचे दृश्य सहजपणे दिसावे म्हणून बॅरिअरची उंची कमी असावी.
व्हीटीएचे अध्यक्ष शर्मा म्हणाले, महामेट्रोने प्राधान्य दिलेल्या फीडर सेवा तातडीने सुरू कराव्यात. प्रवाशांना विमानतळावरून मेट्रो स्टेशनपर्यंत पायदळ जावे लागते. या अंतरावर मेट्रोने फीडर सेवा सुरू करावी. उपाध्यक्ष हेमंत त्रिवेदी म्हणाले, अन्य महामार्गाच्या तुलनेत सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील इमारती जुन्या विकास नियंत्रण नियमांनुसार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची फ्रंट मार्जिन नाही आणि रस्त्यालगत आहे. त्यामुळे मेट्रो ट्रॅकजवळ राहणारे रहिवासी, विशेषत: सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर राहणाऱ्या नागरिकांना मेट्रो रेल्वे धावताना मोठ्या कंपनासह आवाज ऐकावा लागतो. त्यामुळे साऊंड बॅरिअर आवश्यक आहे.
व्हीटीए सचिव तेजिंदर सिंग रेणू म्हणाले, साऊंड बॅरिअर लावण्यासह रामझुल्याच्या दुसऱ्या टप्प्यात लागलेले अस्थायी डिव्हायडर हटविले नसून त्यामुळे अपघात होऊ शकतात. ते तातडीने हटवावे. डॉ. बृजेश दीक्षित म्हणाले, विमानतळ मेट्रो स्टेशनवर फीडर सेवेसाठी इलेक्ट्रिक बसचे आॅर्डर दिले आहेत. मेट्रो ट्रॅकवर साऊंड बॅरिअर लावण्यासाठी निर्णय घेऊ. प्रतिनिधी मंडळात व्हीटीएचे सहसचिव अमरजतीत सिंग चावलाव राजेश कानूनगो, सदस्य श्रीकांत ओक आणि प्रतीश गुजराथी उपस्थित होते.